अजित पवार यांची कोल्हापूरकरवर मेहेरनजर

कोल्हापूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूरवर मेहेरनजर दाखविली आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तर समितीच्या बैठकीत त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात १०४ कोटी रुपयांची वाढ केली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हयाच्या विकासकामांचा तब्बल ३७५ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे राज्यस्तर समितीची बैठक झाली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात २०२१-२२ या वर्षासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्हयासाठी नियोजनाच्या प्रारुप आराखडयाबाबत बैठक झाली. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत कपात न करता चालू वर्षी १०० टक्के निधी उपलब्ध करुन दिला. यासह प्रोत्साहनपर निधी म्हणून ५० कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

या बैठकीत कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज तब्बल १०४ कोटी १५ लाख रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. जिल्ह्याच्या सर्वसाधारण आराखड्यासाठी २७० कोटी ८५ लाख रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधींनी हा निधी वाढवून देण्याची विनंती केली होती. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

पुणे विभागातून नियोजन समिती माध्यमातून प्राप्त होणारा निधी वेळेत आणि निकषाप्रमाणे खर्च करणाऱ्या जिल्ह्याना आता ५० कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळणार आहे. यासाठी वेगवेगळे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. यामध्ये सामाजिक न्यायासाठी असलेल्या निधीचा संपूर्ण वापर, आदिवासी उपयोजना, नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER