पोलीस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांवर अजितदादांचे भाष्य

Ajit Pawar

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच धाडसी शैली आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतात. पोलिसांच्या कार्यक्रमात पोलिसांना मिळणाऱ्या महागड्या गाड्यांबाबत त्यांनी भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, काही पोलीस अधिकारी मुंबईत असताना भेटले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या, त्यांची किंमत ३५ लाख रुपये असल्याचे समजले. याबाबत चौकशी केल्यानंतर महागड्या गाड्या पोलिसांना उद्योगपतीने दिल्या.

सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे. पोलीस शासनाचे कर्मचारी आहेत. उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे, हे चुकीचे आहे. गृहमंत्री कोणती वाहने वापरतात आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात, याकडे जनतेचे लक्ष असते. पोलिसांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या घरांचे काम सरकार प्राधान्याने करत आहे. त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफएसआय आणि चांगले दर्जेदार घर देण्याचा प्रयत्नदेखील करत आहे.” असे अजित पवार म्हणाले.

काल पुण्यात अनुकंपा तत्त्वावरील भरतीचा कार्यक्रम अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते म्हणाले की, “आपल्या हद्दीत गुन्हा होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. आपापल्या हद्दीत रात्रगस्त वाढवावी.” गजानन मारणे प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, “संबंधित पोलिसांनी या प्रकरणात असे वागायला नको होते. संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा त्यांच्या अशा वागण्याने खराब होते. एखादा गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढतो. ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शहराच्या दृष्टीने असे होणे बरोबर नाही. याविषयी पोलिसांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असला पाहिजे. सामान्य लोकांना पोलिसांचा आधार वाटला पाहिजे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER