पवारांनी साकारलेले सरकार पाडणारा अदयाप जन्मला नाही, अजितदादांचे फडणवीसांना आव्हान

Devendra Fadnavis - Ajit Pawar

पंढरपूर :- आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत बोलताना तुम्ही भाजपचा (BJP) एक उमेदवार निवडून द्या, मी सरकार बदलवून दाखवतो, असा सूचक इशारा महाविकास आघाडीला दिला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोण्या येड्या गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला पहिल्यांदाच थेटपणे अजित पवारांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस त्यांच्या सभेत अजितदादांची नक्कल केली होती. त्यावरून आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर…असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली, तरी सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा, यासाठी हे सरकार स्थापन झालं आहे. महाविकास आघाडीला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधकांकडे जेमतेम ११५ आमदार आहेत. आणखी त्यांना ३० आमदार कमी पडत असताना ते सरकार बदलायची भाषा बोलतात. त्यांना हा काय पोरखेळ वाटला का. केवळ निवडणुकीत गाजर दाखवण्याचं त्याचं काम सुरु आहे. सरकार बदलणारा अजून जन्माला यायचा आहे. फडणवीसांनी पावसात घेतलेल्या सभेची खिल्ली उडवताना ते म्हणाले की, तुम्ही कुठे अन् साहेब कुठे असं सांगत, साहेबांनी साकार केलेले सरकार पाडणारा अदयाप जन्माला यायचा आहे, असे म्हणत त्यांनी थेट फडणवीसांना आव्हान दिले.

मागील पाच वर्षांत भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. या भागातील अनेक योजनांना जाणीवपूर्वक निधी देण्यापासून रोखण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचना योजनेला देखील निधी देण्यात आला नाही. आता पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही निधी देऊ असं सांगत आहेत. मग, मागील पाच वर्षांत निधी देण्यासाठी तुमचा कोणी हात धरला होता का, असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकून राहतील का…जयंत पाटील 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button