पंढरपुरात संचारबंदी, उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक महापूजा करणार

Ajit Pawar - Pandharpur

पुणे : कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. नुकतंच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तर यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्निक होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे परवानगी मागण्यात आली होती. निवडणूक आयोगाने नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास मंजुरी दिली आहे.

कार्तिकी शुद्ध एकादशीच्या निमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यातून यंदाही पंढरपूर येथे मोठ्याप्रमाणात दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. कार्तिकी यात्रा काळातही आषाढी प्रमाणे संचारबंदी लागू होणार असून ४ दिवस एसटी बससेवा देखील बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन गंभीर बनले आहे. कार्तिकी काळात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पंढपूरमध्ये (Pandharpur) २२ नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होत असताना दशमीच्या रात्री बारा वाजेपासून म्हणजेच २५ नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रेचा कालावधी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. कार्तिकी शुद्ध एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून दिंड्या निघणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER