अजित पवारांचा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या नेत्यांना टोमणा – त्यांचा आवाका …

Ajit Pawar on Maratha Reservation - Maharashtra Today

पुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा आवाका आम्हाला माहीत आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील याना नाव न घेता टोमणा मारला.

आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणालेत की, काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. हे लोक काही काळ आमच्यासोबत होते त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे.

कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यपालांना भेटलो आहोत, आता वरिष्ठांनाही भेटणार आहोत. कोर्टाने जे ग्राह्य धरले त्यानुसार साकल्याने विचार करू. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले, आणि सदस्य यांचे मत घेतो आहे. लवकरच आम्ही यावर तोडगा काढू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

विरोधकांची भूमिका दुटप्पी

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते. आम्हीच मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. आम्हीच असे केले होते, असे भाजपचे नेते म्हणाले असते. भाजपाच्या नेत्यांच्या याच वृत्तीचा मला राग येतो, असे अजित पवार म्हणालेत.

राज्य सरकारला सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे सारथी संस्थेसंदर्भात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button