‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार !’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

Laxman Savadi - Ajit Pawar

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांना चांगलंच सुनावलं. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असा दावा करणाऱ्या लक्ष्मण सवदी यांना अजित पवारांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. सवदींनी केलेल्या विधानाला कवडीचा आधार नाही, काही तारतम्य नाही, अशा शब्दात त्यांनी सवदींच्या विधानावर पलटवार केला. बेळगावचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

महाजन समितीचाही अहवाल आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. कर्नाटक सरकारने त्यात फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. तसंच ज्यावेळी दोन राज्यांच्या सीमांचा वाद असतो त्यावेळी केंद्र सरकारने हस्तक्षेप करायचा असतो. एकतर्फी बोलायचं नसतं किंवा तसे निर्णयही घ्यायचे नसतात. सीमा भागातील वादग्रस्त भाग आमचा आहे, असा दाखवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार. महाविकास आघाडी सरकार सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तसंच या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. गरीब, मध्यमवर्गीयांना दिलासा देतात का, यावर आमचं लक्ष आहे. गरीब आणि सर्वसामान्य वर्गाला राज्य सरकारकडून दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या काळात सर्वसामान्य उद्ध्वस्त झाला. त्याच्या हिताचे निर्णय बजेटमधून दिसावेत, असं अजित पवार म्हणाले. जीएसटीचा कायदा आणला तेव्हा केंद्राने भूमिका मांडली होती की, जीएसटीचा कर कमी पडला तर आम्ही देऊ; पण अजूनही जीएसटीची संपूर्ण रक्कम आलेली नाही. फेब्रुवारीपर्यंतची जीएसटीची रक्कम मार्चपर्यंत आली पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER