जयंत पाटलांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा, त्यांच्या इच्छेला माझ्या शुभेच्छा ! – अजित पवार

Jayant Patil and Ajit Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इस्लामपुरात एका स्थानिक चॅनलशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. जयंत पाटील यांच्या इच्छेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्या इच्छेला माझा पाठिंबा आहे, असं ‘बोलकं’ उत्तर अजित पवार यांनी दिलं. गेली २५ ते ३० वर्षे मी राजकारणात काम करतोय.

माझं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीनं हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं महत्त्वाचं आणि मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं. पाटलांच्या याच विधानावर अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता अजित पवार यांनी शेलक्या शब्दात उत्तर दिलं. जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो, असं बोलकं उत्तर पवारांनी दिलं. मागील काही दिवसांपासून पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक अजित पवारांच्या संपर्कात असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनी याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. उद्या पुण्याला जाणार आहे.

सध्या पक्षांतरबंदी कायदा आहे. पक्ष सोडल्यास त्यांचं नगरसेवकपद रद्द होईल. भाजपच्या नगरसेवकांचं पक्षांतर ही ऐकीव माहिती आहे. काही मिळालं नाही की माध्यमं अशा बातम्या पसरवात, असं अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकार सुरुवातीपासून मराठा आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. एखादं प्रकरण सुप्रीम कोर्टात असते त्यावेळी निकाल काय लागतो, याची वाट पाहावी लागते. मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येसारख्या मार्गानं जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले. एमपीएससी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरही अजित पवारांनी मत मांडले. एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला नको होती. राज्यातील विविध अडचणींवर आम्ही योग्य मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले. राज्यातील जनतेला समोर ठेवून, सर्व जाती, धर्माच्या नागरिकांवर अन्याय होणार नाही, असं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गानं हे राज्य चालतं, आम्ही त्यांच्या मार्गानं जाणारे आहोत.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरू आहे, असंही अजित पवार म्हणाले. मी फाईल पेंडिंग ठेवणारा माणूस नाही. मोठे निर्णय एक मंत्री घेत नसतो, संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेत असते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची तिजोरी पाहता सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक परिस्थिती आणि कोरोनाचा विचार करून पावलं उचलावी लागतात. केंद्राकडून आमचे २५ हजार कोटी रुपये येणे आहे. ते अजून आले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER