‘ते’ पाच नगरसेवक अपक्ष असल्याचे सांगितले होते – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी नाट्य दिसून आले होते. मात्र, बुधवारला पाचही नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवबंधन हाती बांधले. या नाट्यावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

सारथीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात अजित पवार यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी त्यांना पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी त्या दिवशी बारामतीत होतो. त्या दिवशी गर्दीत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो की, काळजी घ्या. त्या गर्दीत काही वाहनं आली. तिथे निलेश लंके आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे.

त्यावर लंके मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात रुमाल टाकले आणि त्यानंतर कार्यक्रम झाला. मग मला नंतर कळालं की, ते शिवसेनेचे होते. मग ती त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, दादा ते भाजपात प्रवेश करणार होते. त्यांचं म्हणणं होतं की, या नागरसेवकांना राष्ट्रवादीनं प्रवेश दिला नाही, तर भाजपात जाणार. आम्ही माणसांची फोडाफोडी करत नाही.

तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी निलेश लंके यांना बोलावून सगळं समजावून सांगितलं. त्यानंतर त्या नगरसेवकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पाठवलं. तुमच्यावर काही अन्याय झाला असेल किंवा व्यथा मांडायची तर तुमचे वरिष्ठ सोडवतील, असं त्यांना सांगितलं. या बाबतीत कधीही मुख्यमंत्री नाराज नव्हते. ते मला कधीही  बोलले नाहीत. ते नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांनीच दाखवल्या, असं अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER