प्रतिज्ञापत्र देऊनही सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दिलासा नाही

Ajit Pawar

मुंबई :- बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसिंचन मंत्री अजित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केलं आहे. यात सिंचन घोटाळ्यातील सर्व प्रकरणं मागे घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. मात्र असे असले तरी त्यांना दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आता १३ फेब्रुवारी अंतिम सुनावणी होणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यातचं जनेतेच्या समस्यांवर काम करणाऱ्या जणमंच या सामाजिक संस्थेने सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआय किंवा इडीने करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत, मी मंत्री असताना नियमानुसार जबाबदाऱ्या पार पाडल्या. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तर सादर केले आहे. तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करीत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही प्रकारचा विरोधाभास नाही. याचिकाकर्त्याचे सर्व आरोप निरर्थक व बिनबुडाचे आहेत असे पवार यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

यामुळे या घोटाळ्यात मी आरोपी नाही, मला आरोपी ठरवता येणार नाही, तसेच माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयास देता येणार नसल्याचे त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मात्र आता १३ फेब्रुवारीला या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे. अजित पवारांबाबत न्यायालय कुठला निर्णय देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सिंचन घोटाळ्यातील सर्व प्रकरणे मागे घ्या – अजित पवार