अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ncp-leaders-meets-cm-devendra-fadanvis.jpg

मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक शेतकरी प्रश्नांवर गाजणार असे दिसते. शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी शिवसेनेचा मोर्चा, खासदार राणांनीही संसदेत शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. त्यातच राष्ट्रवादीचे नेतेही शेतक-यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले असून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.

या निवेदनामध्ये विविध मुद्द्यांवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचीदेखील घोषणा करण्यात आली होती. या अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. ते अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. या निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आणून देण्याचं काम राष्ट्रवादीनं केलं आहे. हे सरकार शेतक-यांच्या बाबतीत उदासीन असल्याची टीकाही राष्ट्रवादीनं केली आहे. ‘सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणाऱ्या लाभांपासून विविध कारणांमुळे ५० लाखांपेक्षा जास्त कुटुंबे वंचित आहेत.

ही बातमी पण वाचा:- आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

अशा अनेक योजनांपासून आज शेतकरी आणि त्यांची कुटुंबे वंचित आहेत . याला पूर्णपणे केंद्रातील आणि राज्यातील सरकार जबाबदार आहे’ असा आरोप या निवेदनामध्ये राष्ट्रवादीने केला आहे. राज्याच्या काही भागांत पहिला पाऊस झाल्यानंतर मोठा खंड पडला, तर राज्याच्या काही भागांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचीसुद्धा वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांचे अनुदान शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.