दोन महिन्यापासून अजित पवार अस्वस्थ, ठाकरे सरकारसाठी धोक्याचा इशारा

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar

पुणे : राज्यात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात वाढलं असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे केवळ पुण्याकडे लक्ष घालून कमालीचे शांत आहेत.सध्या ते माध्यमांशीही चर्चा करताना दिसून आले नाही. मात्र त्यांचं काम सुरूच आहे. कोरोनाशी सरकार लढत असतानाच महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचं मुख्य कारण हे अजित पवारांची अस्वस्थता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार नाराज असणं ही ठाकरे सरकारसाठी धोक्याचा इशारा आहे अशी चर्चाही रंगल्याची बातमी न्युज १८ लोकमतने दिली आहे.

अजित पवार हे कामाच्या झपाट्यासाठी ओळखले जातात. सुरुवातीला काही पत्रकार परिषदांमधून त्यांनी अनेक निर्णय जाहीर केले. मात्र नंतर ते फारसे पुढे आले नाहीत. त्यानंतरच महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. त्यात राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारणही हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे.

दुसरीकडे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १77 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सावरकरांच्याफोटोला पुष्पहार घालून अजित पवार यांनी गुरुवारी राजकीय वर्तुळात गोंधळ उडवला. महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पवार हे पहिले नेते आहेत ज्यांनी अधिकृतपणे सावरकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना भाजपच्या तंबूत गेलेल्या अजित पवारांचं मन वळवून त्यांना पुन्हा परत आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं महत्त्व पूर्वीसारखच राहिल याचं आश्वासन त्यांना शरद पवारांकडून देण्यात आलं होतं.

नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यातही आलं. मात्र आता दादांची पक्षावरची पकड पूर्वीसारखी राहिली नाही असं म्हटलं जात आहे. आता सर्व सूत्र ही शरद पवारांनी आपल्या ताब्यात ठेवली आहेत. कोरोनाच्या गंभीर काळात गेल्या दोन महिन्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्याचं पुढे आलेलं नाही. आपल्याला पद्धतशीरपणे डावललं जातंय असं अजित पवारांना वाटतं अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या सुरूवातीच्या काळात अजित पवारच प्रशासनाचा गाडा हाकत आहेत असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र कोरोनानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणांनी त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या संयमी बोलण्याचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर प्रकाशझोतात आलेलं दुसरं नाव म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं टोपेंच्या कामाचही प्रचंड कौतुक झालं. तर तिसरं नाव चर्चेत आलं ते गृहमंत्री अनिल देशमुख यांचं. या शरद पवारांनी बळ दिल्याचं म्हटलं जात आहे. संकटाच्या काळात शांत राहाण अजित पवारांच्या शैलीत बसणारं नाही. त्यांचा कामाचा उरक, आवाका हा जास्त आहे, निर्णयक्षमता जबरदस्त आहे असं म्हटलं जात असतानाही ते मागे राहताहेत की त्यांना जाणीवपूर्वक मागे ठेवलं जातय याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अर्थ खात्यांशी संबंधित गोष्टी जयंत पाटलांनी वाचून दाखवल्या हेही अनेक गोष्टी सूचित करतं असं म्हटलं जातं. शरद पवार हे अजित पवारांच्या क्षमता पूर्ण जाणून आहेत. असं असूनही तब्येतीची काळजी न करता वयाच्या 80व्या वर्षी स्वत: शरद पवार बाहेर पडले आहेत. पुढे आणले गेलेले चेहरे म्हणजे राजेश टोपे आणि अनिल देशमुख हे शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातले आणि जवळचे समजले जातात.

विधानसभा निवडणुकीपासूनच अजित पवार हे नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे. सुप्रिया सुळेंची वाढत चाललेली सक्रियता, रोहित पवारांना शरद पवारांनी दिलेलं बळ. पार्थ पवारांचा लोकसभा निवडणुकीतला पराभव, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचं फसलेलं बंड यामुळे अजित पवारांची नाराजी वाढलेली आहे. त्यामुळेच अजित पवारांसारखा नेता जर अस्वस्थ असेल तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार कसं स्वस्थ राहणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER