बारामतीकरांना कोरोनापासून वाचवण्यासाठी अजित पवार वापरणार हा ‘पॅटर्न’

Ajit Pawar

बारामती : पुणे शहरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीत कोरोनाने शिरकाव केला आहे. सध्याच्या घडीला बारामती येथे कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहचली आहे. त्यामुळे बारामतीकरांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता बारामतीत `भिलवाडा पॅटर्न` राबविण्याचा निर्णय खुद्द अजित पवार यांनी घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती अजित पवार यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली. राजस्थानमधील भिलवाडामध्ये ज्याप्रमाणे पूर्णपणे लॉकडाऊन करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे त्याचप्रमाणे बारामतीतही हा पॅटर्न राबवण्याची गरज असल्याची माहिती पवार यांनी दिली.

बारामती शहरातील प्रत्येकाची घरोघर जाऊन तपासणी करणे, ही तपासणी एकदाच करून थांबायचे नाही तर किमान तीन वेळा तपासणी करायची, या तपासणीसाठी वेगळी टीम काम करणार, ज्या नागरिकांना सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे आढळतील त्यांच्यावर विशेष लक्ष वैद्यकीय पथकांमार्फत पुरविले जाणार, सर्व जीवनाश्यक वस्तू लोकांनी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षाही त्यांना घरपोच पुरविण्याची व्यवस्था करणे, अशा उपायांचा भिलवाडा पॅटर्नमध्ये समावेश आहे. बारामतीकरांनी कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नये, असे आवाहन अजित पवार यांनी पुन्हा एकदा केले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात कोण आले होते तसेच त्यांना कोणामुळे लागण झाली असावी याचा शोध वेगाने सुरू असून हा आकडा वाढू नये यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर खुद्द शिवसेनेच्या महापौर सरसावल्या कोरोनाच्या रुग्ण सेवेसाठी

बारामतीकरांनी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत स्वयंशिस्त पाळावी, घराबाहेर न पडता घरात राहून आपापली कामे करण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण रस्त्यावर कोणीही येऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. पोलिस प्रशासनावर विनाकारण ताण येऊ नये याची काळजी बारामतीकरांनी घेत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पवार यांनी केले आहे.