सिंचन घोटाळ्यातील सर्व प्रकरणे मागे घ्या – अजित पवार

नागपूर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केलं आहे. यात त्यांच्यावरील सर्व प्रकरणं मागे घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. तसेच सिंचन घोटाळाप्रकरणी त्यांच्याविरोधातील दाखल याचिका रद्द करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

मंत्री असताना नियमानुसार जबाबदाऱ्या पार पाडल्या. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तर सादर केले आहे. तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करीत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही प्रकारचा विरोधाभास नाही. याचिकाकर्त्याचे सर्व आरोप निरर्थक व बिनबुडाचे आहेत असे पवार यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे या घोटाळ्यात मी आरोपी नाही, मला आरोपी ठरवता येणार नाही, तसेच माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयास देता येणार नसल्याचे त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले आहे.