चर्चेतून मार्ग काढणार : औरंगाबादच्या नामांतराला अजितदादा अनुकूल

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) कारण्यावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना नामांतर करण्याच्या विचारात असताना सत्तेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र याला विरोध केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आली. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरू आहे. नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि मार्ग काढू, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. प्रकाश आंबेडकरांनी पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टिकावी आणि विकासाला महत्त्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करून पुढे जात आहोत.” मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.

शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली आहे. यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीची सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करून पुढं जायचं अशी चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील; पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होईल. ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी या बाबतीत सकारात्मक आहे, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण जुळू शकतं का ? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे.

आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करू. महाविकास आघाडीला अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न असेल. जीएसटीची २६ हजार कोटींची थकबाकी आहे. पण दर आठवड्याला पैसे येऊ लागले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. अतिवृष्टिग्रस्त आणि अवकाळी पावसांचा फटका बसलेल्यांसाठी केंद्राकडून दिली जाणारी मदत अद्याप मिळाली नसल्याचंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER