अजित पवारांकडून मुंबई विद्यापीठाच्या विकासासाठी 200 कोटी रुपये देण्याचा निर्णय जाहिर

मुंबई : मुंबई विद्यापीठाला १६० वर्षांचा ऐतिहासिक आणि गौरवशाली वारसा आहे. विद्यापीठाच्या इमारतीचे सौंदर्य व परिसराला जागतिक वारशाचे महत्व आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत व परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करुन तेथील निसर्गसंपदा वृद्धींगत करण्यात येणार असून त्यासाठी दोनशे कोटींचा निधी चार वर्षात टप्प्याटप्याने उपलब्ध करण्याचा निर्णय उपमुख्ममंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केला.

विद्यापीठाच्या इमारतीचे सौंदर्य व परिसराला जागतिक वारशाचे महत्वे आहे. मुंबई शहर आणि शहरातील इमारतीचे सौंदर्य खुलवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ इमारत व परिसराला मूळ सौंदर्य बहाल करुन तेथे शिकणाऱ्या व भेट देणाऱ्या नागरिकांना आनंददायी वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यानिर्णयांतर्गत यावर्षी पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी देण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ आणि एमएमआरडीए यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्र- कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

बारामती फलटण-लोणंद रेल्वेच्या कामाला गती देण्याचे निर्देश 

बारामती फलटण – लोणंद या ६३ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आज मंत्रालयात खासदार सुप्रियाताई सुळे, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत यासंदर्भात आयोजित बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला.

यापैकी ३७ किलोमीटर रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जात आहे. त्यासाठीचे भूसंपादन, भूसंपादनासाठी उपलब्ध निधी आदीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात भूसंपादनासाठी २३९ कोटी रुपये आवश्यक असून ११५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरीत भूसंपादन समन्वय व सामंजस्याने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.