कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे : राष्ट्रवादीला गृह खाते देऊ नये, नाही तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच सीसीटीव्ही कॅमेरा लावतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यात  नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला आहे.

पुण्यात ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी विविध मुद्यांवर संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीला गृह खाते देऊ नये. यानंतर पवार म्हणाले, आम्ही त्यांचे सरकार असताना असे काहीही वक्तव्य केले नाही. १०५ जागा निवडून येऊनही त्यांचे सरकार बनले नाही.

याचेच त्यांना दु:ख आहे. त्यांनी अधिवेशन काळात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिले होते. मात्र त्यासाठी त्यांनी “चोराच्या मनात चांदणे” आणि “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही” अशी म्हण वापरली. पक्ष देईल ते पद स्वीकारण्यास तयार असून एखादे महत्त्वाचे खाते मिळू शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले. कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा कुठलाही वाद महाविकास आघाडीत नाही. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले. याबाबत मुंबईत बोलणे झाले असून तीनही पक्षांच्या प्रमुखांनी निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.