…तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही : अजित पवार

Ajit Pawar

नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबाबत कुठलाही शब्द दिला नव्हता; मात्र विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, असा आरोप आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्ग येथे केला. त्यांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

शिळ्या गढीला ऊत आणण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात आणि अमित शहा यांच्यात मुख्यमंत्री पदावरून बंद खोलीत चर्चा झाल्याचं वारंवार सांगितलंय, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. अजित पवार यांनी नागपूरमध्ये मीट द प्रेस या कार्यक्रमात बोलताना अमित शहांच्या आरोपांना खोडून काढले.

अजित पवार म्हणाले, शिळ्या कढीला ऊत आणण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे त्यांच्यात आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली होती. मी काही तिथे नव्हतो, मी ज्योतिषी नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हापासून सांगितलं जातंय की हे सरकार जाईल. मात्र आमच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा या सरकारला आशीर्वाद आहे. जोपर्यंत हा आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही. आम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय करतो, विसंवाद नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही भाजपपेक्षा बरेच पुढे राहिलो, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मध्ये बातम्या पण मला अशा वाचायला मिळाल्या. खरं तर यात माझीही चूक आहे. मी माझी चूक नाही असं म्हणणार नाही. माझ्याकडून काही कळण्याआधीच ‘अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं’ अशा बातम्या वाचायला मिळाल्या. वास्तविक मी प्रत्येक विभागाच्या डीपीसीच्या बैठका घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील घेतल्या. सर्वच विभागांमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागे जयंत पाटील हेदेखील अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या परीने काम केले. मी पण माझ्या परीने काम करतो. आजही मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मिहानबद्दल अलिकडे बैठक झाली नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा बराच काळ कोरोना महामारीत गेला आहे. त्यामुळे विकासदर घटला. अजूनही जीएसटीचे ३५ हजार कोटी केंद्राकडून आलेले नाही. आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले तरी जेवढे पैसे यायला हवे होते ते येत नाही. निधीअभावी अनेक कामांना कात्री लावावी लागली. अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला. पण, आता कोरोना हळूहळू कमी होतोय. पुण्यात काल एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं, अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माझ्या आधी मुख्यमंत्री येऊन गेले. प्राणिसंग्रहालयाच्या कार्यक्रमात आले, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी पाऊस चांगला असल्याने धरणाची स्थिती समाधानकारक आहे. कोरोना काळात आर्थिक स्थिती कमकुवत झाली असताना काही महत्त्वाच्या विभागांना आम्ही निधी कमी केला नाही. जिल्हा विकास निधीला कात्री लावली नाही. रियल इस्टेट क्षेत्रात आम्ही मुद्रांक शुल्क कमी केले, त्याला डिसेंबरपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. जानेवारीपासून तेवढी खरेदी नाही. केंद्रीय अर्थसंकल्पानंतरही बाजारात हवा तसा उठाव आला नाही. मात्र, स्टील, सिमेंट, डांबराच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. या सर्व वस्तूंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढली आहे. सोबत डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. काही काळात पेट्रोल नक्कीच शंभरी गाठेल, असंही अजित पवार म्हणाले.

कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने करायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्याबद्दल वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. अजूनही बाजारातील अनेक सेवांना ग्राहकांचा हवा तेवढा प्रतिसाद नाही. हळूहळू भीती कमी होईल, त्यानंतर बाजारात तेजी येईल आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थसंकल्पाबद्दल सध्या काहीच बोलणार नाही. कारण ते सहकारी पक्ष आणि मुख्यमंत्र्यांसोबत बोलून ठरेल. अर्थमंत्री म्हणून माझ्या मनात निश्चित काही योजना आहेत.

यावेळी त्यांनी वीज बिल माफीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, कोणतेही वक्तव्य करताना मंत्र्यांनी आर्थिक भार पडणार आहे, त्याचा अंदाज घेऊन बोलावे अशी अपेक्षा असते. कारण केलेली घोषणा तिजोरी पेलू शकणार का हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही (नितीन राऊत) मंत्र्याने शहानिशा न करता घोषणा केली असे मी म्हणणार नाही, उद्या अजित पवार यांनीही अंदाज घेऊन बोलले पाहिजे, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER