अजित पवार सध्या नाराज की खुश? हे शरद पवारच सांगू शकतील – फडणवीस

Devendra Fadnavis - Sharad Pawar - Ajit Pawar

अकोला : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापनेबाबत इनसाईडरच्या मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटानंतर, राजकीय वातावरणात चर्चा सुरु झाल्या आहेत. सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादीने थेट ऑफर दिली होती. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. तसंच अजित पवारांसोबतच्या शपथविधीबाबतही फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आज विदर्भ दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, ते तुम्हाला आता भेटतात का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, अजित पवार सध्या राजी की नाराजी? याबाबत शरद पवारच सांगू शकतील, मी काय सांगू?, असे म्हणत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. तसेच राज्य सरकार कन्फ्युज आहे. परीक्षा कुणाच्या घ्यायच्या? आणि डिग्री जर विनापरीक्षेची मिळाली तर नोकरीसाठी अडचणी येतील. राज्य सरकारने कन्फ्युज होऊन निर्णय करु नये, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

बोगस बियाणं प्रकरणात महाबीज असो की खाजगी कंपन्या कारवाया व्हायला हव्यात. चीनच्या दुतावासाने राजीव गांधी फाऊंडेशनला मदत दिली त्याचं उत्तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात का देत नाहीत? काँग्रेसने चीनला कुठली मदत केली? याचं उत्तर त्यांनी द्यावं. पीएम केअरमध्ये चीनच्या कंपनीनं मदत केली की नाही कुणालाच माहिती नाही, असंही फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी निघाली. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही त्यांना आता नवे कर्ज मिळत नाही. सरकारने बँकांना हमी दिली असली तरी या हमीवर कर्जवाटप होत नाही, त्यामुळे बँकांनी सरकारचा आदेशच जुमानला नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER