अजित पवार यांच्या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार ; परिचारक समर्थकांसह अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर

ajit pawar ncp

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (८ एप्रिल) दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. यावरून अजित पवार यांच्या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसते . काल शेवटची सभा संपवून अजित पवार हे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना घेऊन पहिल्यांदा धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी पोहचले. इथे धनगर समाजाचे  अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. हा भाजपला पसंती देणारा मतदार अशी ओळख असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी तुमच्या मागण्या पूर्ण करून तुमच्या मागे उभे राहील, असं सांगत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

दत्तात्रेय भरणे हेदेखील धनगर समाजाचे असून त्यांना आधी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि नंतर दोन वेळा आमदारकी आणि मंत्रिपद दिल्याने धनगर समाज आपलेसे करण्याची बेरजेची खेळी पवार यांनी खेळली. यानंतर मनसेचे राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जात त्यांनी मनसैनिकांशी चर्चा केली. यावेळी मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जमले होते. मग अजित पवार यांनी आपला मोर्चा थेट परिचारक गटाच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांच्याकडे वळवला. साधना भोसले यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आणि चर्चा केल्याने भाजपला घाम फुटला. साधना भोसले या भाजपच्या चिन्हावर पंढरपूरच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.

त्यांचे पती आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी यावेळी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने ते नाराज होते. याचाच फायदा उठवत अजित पवार यांनी साधना भोसले यांची भेट घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. एकंदर अजित पवार आता आपले सर्व फंडे या निवडणुकीत बाहेर काढत असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे. या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस अद्याप प्रचारात उतरले नसले तरी अजित पवार यांचा झंझावात भाजपाला नामोहरम करून सोडत आहे. आज (९ एप्रिल) दिवसभर अशाच पद्धतीने अजित पवार मंगळवेढ्यात प्रचार आणि भेटीगाठी करणार असल्याने भाजपची चिंता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button