अजितदादांच्या जिल्ह्याची सुत्रे यंदाही फडणवीसांकडेच?

पुणे : पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation)सध्या भाजपाची सत्ता आहे. लवकरच आता पुणे महापालिकेचीही निवडणूक येऊ घातली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शहरातील प्रलंबित प्रश्‍नांसाठी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. या वेळी शहराच्या प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे जिल्ह्यात पवारांची मक्तेदारी असल्याचे मानले जाते. मात्र असे असले तरी मागील काही वर्षांपासून पुणे महापालिकेत भाजप सत्तेत आहे.

या महापालिकेसाठी आधी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (handrakant Patil) आणि त्यानंतर थेट विरोधीपक्ष नेतेच महापालिकेत लक्ष घालणार आहेत.

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन चार वर्षांचा कालखंड झाला आहे. याच काळात मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडवीस यांनी शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे नवे प्रकल्प आणले, काही प्रकल्पांना गती दिली. या प्रकल्पांना असणारी गती आणि आढावा घेण्यासाठी देवेंद्रजी आढावा बैठक घेत असून याचा फायदा निश्‍चितच शहराला होणार आहेत. या बैठकीत ते मेट्रो, स्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएलच्या कामकाजाचाही आढावा घेणार आहेत. देवेंद्रजी पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आणि आता संवेदनशील विरोधीपक्ष नेते म्हणून दाखवून दिलेले आहे असे पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. .

दरम्यान, मागील आठवडयात पक्षाच्या नगरसेवकांसाठी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांनी शहराच्या प्रलंबित विषयांचा तसेच सुरू असलेल्या महत्त्वांकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ही भेट होत असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीत पुणेकरांनी विक्रमी बहुमताने भाजपला महापालिकेची सत्ता दिली आहे. त्यावेळी, केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता होती.

मात्र, त्यानंतर आता राज्यात सत्ता बदल झाला असून राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून भाजपमधील नाराजांना गळाला लावण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी, भाजपने निवडणुकीत दिलेली आश्‍वासने, गेल्या चार वर्षात केलेली कामे या वरून भाजपला घेरण्याचे काम सुरू केले आहे.

त्यामुळे भाजपही सतर्क झाली असून भाजपच्या शहरातील ज्येष्ठ नेत्यांकडून शहराच्या विकासकामांचा वारंवार आढावा घेतला जात असून निवडणूकांपूर्वी सर्व महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खासदार गिरिश बापट, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील नियमित बैठका घेत असून आता थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसच विकासकामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजप सक्रीय झाली असून थेट विरोधीपक्ष नेत्यांनीच पालिकेत लक्ष घातले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER