अण्णासाहेब पाटील महामंडळावरही अजितदादांच्या खात्याचे नियंत्रण

काय आहे शासनाचा नवा आदेश?

Annasaheb Patil - Ajit Pawar

मराठा समाजाच्या (Maratha Community) कल्याणार्थ विविध योजना राबविणे, या समाजातील तरुण-तरुणी, उद्योजक यांना विविध योजनांद्वारे प्रोत्साहन देणे यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना सारथी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आले आणि सारथी या संस्थेची स्वायत्तता काढून घेण्यात आली. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार सारथीच्या संचालक मंडळाकडे राहिले नाहीत.

प्रत्येक छोट्यामोठ्या खर्चासाठी बहुजन कल्याण विभागाची परवानगी घ्यावी लागत होती. कारण या विभागाने आदेशच तसा काढला होता. त्यावर बरेच रणकंदन झाले. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सारथीच्या पुण्यातील मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्याने शासनाला जाग आली. नगरविकास मंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुण्याला पोहचले आणि त्यांनी सारथी पूर्वीप्रमाणे स्वायत्तता बहाल केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनाची पूर्तता होता होता एक वर्ष उलटले. मराठा समाजाकडून पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर मग गेल्या महिन्यात ही स्वायत्तता बहाल करण्यात आली. सारथीची सूत्रे बहुजन कल्याण विभागाकडे होती.

हे खाते काँग्रेसचे (Congress) विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडे आहे. वडेट्टीवार सारथीला न्याय देत नसल्याची टीका झाली होती. वडेट्टीवार ओबीसी आहेत आणि या समाजाचे नेते म्हणून ते समोर येऊ पाहात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक बैठक घेऊन सारथीचा कारभार यापुढे नियोजन विभागाकडे असेल असा निर्णय घेतला. वित्त व नियोजन विभाग हा अजितदादांकडेच आहे. त्यामुळे सारथीच्या कारभारावर पवार यांचे नियंत्रण आले. त्यापाठोपाठ आता एक महत्त्वाचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ कार्यरत आहे. या महामंडळाला ४०० कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले आहे. मराठा समाजाचे थोर नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) यांचे नाव या महामंडळाला देण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील हे या महामंडळाचे आॅगस्ट २०१८ पासून अध्यक्ष होते. त्यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

गेल्या वर्षी झालेली लोकसभा निवडणूक पाटील यांनी सातारा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे लढली; पण त्यांचा राष्ट्रवादीचे छत्रपती उदयनराजे यांनी पराभव केला होता. निवडणुकीपुरता पाटील यांनी महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता; पण फडणवीस यांनी त्यांची पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली. नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटील यांना मातोश्रीवर बोलावून तू चांगले काम करतो आहेस, अध्यक्षपदी तूच राहा असेही सांगितले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी पाटील यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले.

त्यांच्यासोबतच्या सात संचालकांनाही बरखास्त करण्यात आले. आतापर्यंत या महामंडळाचा कारभार हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाकडे होता. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे या विभागाचे मंत्री आहेत. आता महामंडळाचा कारभारही सारथीप्रमाणे अजित पवार यांच्या अखत्यारीतील नियोजन विभागाकडे सोपविण्याचा आदेश गुरुवारी निघाला. त्यामुळे सारथी आणि महामंडळ या दोन्हींवर अजित पवार यांनी पकड मजबूत केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER