भांबळे मंत्री न झाल्याच्या अजितदादांना आजही वेदना, तर भांबळे भारावून म्हणाले…

Ajit Pawar - Vijay Bhambale

परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील जिंतूरचे आमदार विजय भांबळे (Vijay Bhambale) यांचा विधानसभेत झालेला पराभव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आजही पचवू शकलेले नाही. भांबळे विजयी झाले असते तर, मंत्री राहिले असते असे म्हणत अजितदादांनी आपले दुःख कार्यकर्त्याला बोलून दाखवले. अजित पवारांना एका सामान्य तरुणाने केलेल्या फोनवरील संभाषणावरुन हे स्पष्ट झालं आहे. तर याच ध्वनीफितीत परभणी जिल्हा का मागासलेला आहे, याचे कारणही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

हे संभाषण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार आणि जिंतूर तालुक्यातील एका तरुणाचे आहे. या तरुणाचं नाव अद्याप पुढे आलेलं नाही. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. जिंतूर येथील बँकेचा व्यवस्थापक पीक कर्ज देत नसल्याचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी या तरुणाने अजित पवारांना फोन केला. यावेळी अजित पवारांनी पहिला शब्द काढला तो, “बरं केलं, तुम्ही विजय भांबळेला पाडलं ते”, असं म्हणत अजित पवारांनी आपली वेदना बोलून दाखवली. ते इथेच थांबले नाहीत, तर ‘विजय भांबळे आज मंत्री राहिले असते’, असं सांगून ही मोकळे झाले. शिवाय राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे यांना पाडून रासपच्या एका जेलमध्ये असलेल्या रत्नाकर गुट्टेना गंगाखेडकरांनी निवडून दिल्यानेच परभणी जिल्हा मागे असल्याचे अजित पवारांनी कडक शब्दात स्पष्ट केले. आमची जनता आमच्या दोन पिढ्यांना सतत निवडून देते, हे ही सांगायला ते विसरले नाहीत. सरते शेवटी तुझी काय अडचण आहे, ते मला व्हॉट्सअ‌ॅप कर मी त्यांना बोलतो, असंही अजित पवार म्हणाले.

यावरुन लक्षात येते की, जिंतूरच्या विजय भांबळे यांचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. जिंतूर मतदार संघातून 2019 ला भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी विद्यमान आमदार विजय भांबळे यांचा 2 हजार मतांनी पराभव केला. तो पराभव अजून ही अजित पवार विसरलेले नाहीत. त्याचं कारण म्हणजे अजित पवार रामप्रासाद बोर्डीकर यांच जून वैर आहे. तेव्हापासून बोर्डीकर फॅमिलीच्या विरोधात अजित पवारांनी दंड थोपटले आहेत. असं असलं तरी अजित पवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय भांबळे मात्र भलतेच खुश झाले आहेत.

ही ऑडिओ क्लिपव्हायरल झाल्या नंतर भांबळे अजित दादांच्या प्रेमाणे भारावून गेले आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून अजितदादांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. काल माझ्या मतदारसंघातील एका तरुणाच तुमच्यासोबत फोनवर झालेलं संभाषण ऐकलं. आपण फार उद्विग्न होऊन बोललात, आपण राज्याचे दिग्गज नेते आहात. माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्या बद्दलची आपल्या मनात असलेली आस्था बघून मला भरून वाटलं. मी माझ्या माणसांची कामे सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, कुटुंबाला वेळ न देता जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालो. परंतु मीच कुठेतरी कमी पडलो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचे दुःख वाटते.

दादा माझा पराभव आपल्या जिव्हारी लागला हे माझ्यासाठी वेदनादायी आहे परंतु मी तुमचाच कार्यकर्ता आहे, हार माणणाऱ्यांपैकी नाही. जोपर्यंत तुमची साथ आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत काम करत राहील.

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझी कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असते. आपल्याला ज्या तरुणाने फोनवरून बँकेचा प्रश्न मांडला, त्याच शेतकऱ्यांच्यासाठी मागच्या वर्षी बँकेत प्रश्न उपस्थित केला असता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता, असे २६ खोटे गुन्हे माझ्यावर झालेले आहेत. त्यातला एकही गुन्हा माझ्या वैयक्तीक स्वार्थासाठी नव्हता आणि कधीच नसेल.

आदरणीय दादा,
आपण फोनवर म्हणालात की, “विजय भांबळेला निवडून दिल असत तर तो आज मंत्री राहिला असता.” माझी मंत्री होण्याची कधीच अपेक्षा नव्हती, आपण कायम माझ्यावर विश्वास दाखवलात हेच माझ्यासाठी जास्त मोलाचं आहे. माझ्या मतदारसंघातील माय-बाप जनतेचे प्रश्न सोडविणे, माझ्या मतदारसंघाचा मागील ३० वर्षाचा अनुशेष भरून काढणे हेच माझे उद्दिष्ट आहे.

यंदा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही परंतु मी पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि जनतेचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमच्यासोबत “विधानसभेत” असेल….!! असा विश्वास त्यांनी अजितदादांना दिला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या गडावर दादांची करडी नजर असल्याने विजय भांबळे यांना मंत्री देणं त्यांना आवश्यक वाटत होतं. पण, भांबळेंनाच जिंतूरकरांनी घराचा रस्ता दाखविल्याने दादांना स्वप्नावर विरजण पडलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER