अजिंक्य कर्णधाराने शुभमान व सिराजला दिले श्रेय

मेलबोर्न कसोटीत (Melbourne Test) आपल्या शतकी खेळीने व नंतर विजयी धाव काढलेल्या नाबाद 27 धावांच्या खेळीने रहाणेने (Ajinkya Rahane) कर्णधार म्हणून अजिंक्य राहण्याचा आपला पराक्रम कायम ठेवला आहे. त्याने शतक केलेला सामना भारत गमावत नाही ही परंपरासुध्दा कायम राहिली आहे. असे असले तरी या ‘अजिंक्य’ कर्णधाराने आपल्या संघाच्या यशाचे श्रेय पदार्पणवीर शुभमान गील (Shubhaman Gill) व मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांच्या चांगल्या कामगिरीला दिले आहे.अॕडिलेडमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर या दोघांनी जी खंबीरता दाखवली ती कौतुकास्पद असल्याचे त्याने म्हटले आहे.

कसोटी सामना जिंकण्यासाठी 70 धावांचे लक्ष्य तसे मोठे नसते पण जो संघ 10 दिवसांपूर्वीच अवघ्या 36 धावात बाद झाला त्याच्याबद्दल असे म्हणणे धाडसाचे ठरते. पण ते 36 धावांचे भूत अजिंक्यच्या नेतृत्वात भारतीय खेळाडूंनी पूर्णपणे गाडले. त्याला शब्दशः मूठमाती दिली. शुभमान 35 धावांवर तर सामनावीर कर्णधार अजिंक्य रहाणे 27 धावांवर नाबाद राहिला. चौथ्याच दिवशी भारताने सामना जिंकला आणि ही मालिका भारतीय संघ 4-0 अशी गमावेल अशी टिंगल करणारे तोंडघशी पडले.

पहिलाच सामना खेळणाऱ्या शुभमान व सिराजचे कौतुक करताना कर्णधार म्हणाला, या खेळाडूंचा खरोखर अभिमान वाटतो. ते ज्या खंबीरतेने खेळले त्यासाठी त्यांनाच श्रेय द्यायला हवे. दुसऱ्या डावात उमेश यादवसारखा खेळाडू उपलब्ध नसताना त्यांनी दाखवलेला कणखरपणा महत्त्वाचा ठरला.

पाच गोलंदाजांची योजना महत्त्वाची ठरली. अष्टपैलु खेळाडूचा आम्ही विचार करत होतो पण जडेजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. शुभमानने त्याचा लढावु बाणा आणि संयमी वृत्ती दाखवली. सिराजने अगदी शिस्तीत गोलंदाजी केली.पहिल्या सामन्यातील खेळाडूकडून एवढी शिस्तबध्द गोलंदाजी होणे कठीणच असते आणि त्याची अपेक्षाही कुणी करत नाही पण प्रथम श्रेणी क्रिकेट तुम्हाला ह्याच गोष्टी शिकवते असे रहाणेने म्हटले आहे.

अॕडिलेडचा विचार करुन हतोत्साहित होणे स्वाभाविक होते पण आम्ही तसे होऊ दिले नाही. आम्ही जीद्दीने खेळलो आणि लढलो. सांघिक कामगिरी करुन दाखवली. ती केली तरच यश हाती येईल हे आम्ही जाणून होतो. आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती पण ते हुकल्यावर आम्ही गोलंदाजीत भरकटलो नाही. अश्विनने सुरुवातीलाच त्यांच्यावर दबाव आणला आणि नंतर पदार्पण करणाऱ्या शुभमान व सिराजने अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली. तीन चार वर्षे प्रथम श्रेणी व भारत अ संघासाठी खेळल्याचा अनुभव आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना फार महत्त्वाचा ठरतो हे भारतीय कर्णधाराने पुन्हा पुन्हा सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER