अजय देवगणच्या चित्रपटाला मिळाली 112 कोटींची रक्कम

Bhuj - Ajay Devgan

लॉकडाऊनमुळे (Lockdown) थिएटर्स बंद असल्याने अनेक तयार झालेले चित्रपट प्रदर्शनाविना पडून आहेत. आता थिएटर्स सुरु झाले असले तरी प्रेक्षक येत नसल्याने कोणताही निर्माता आपला नवा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्याचे धाडस करीत नाही. त्यामुळेच अनेक मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) रस्ता धरत आहेत. अमिताभच्या ‘गुलाबो सिताबो’पासून याची सुरुवात झाली होती. त्यानंतर अनेक मोठे चित्रपट ओटीटीवर आले आहेत. आता अजय देवगणही (Ajay Devgan) त्याचा बहुचर्चित ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटही थिएटर्सऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यास तयार झाला आहे. पुढील वर्षी चित्रपटांच्या प्रदर्शनाची रांग लागणार असल्याने प्रचंड स्पर्धा होणार आहे. त्यात निभाव कसा आणि किती लागेल याची शंका प्रत्येक निर्मात्याच्या मनात आहे. त्यामुळेच ओटीटीचा सोपा मार्ग अवलंबला जात आहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवाले अशा चित्रपटांना चांगली रक्कमही देत आहेत.

सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाला एका ओटीटी प्लॅटफॉर्मने 250 कोटी रुपये देऊ केले होते. परंतु सलमान खानने कितीही उशीर झाला तरी ओटीटीऐवजी थिएटरमध्येच चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. अजय देवगणने मात्र बदलाची चाहूल लक्षात घेऊन भुज चित्रपट ओटीटीवर देऊन टाकला आहे. या चित्रपटासाठी अजय देवगणला तब्बर 112 कोटी रुपये देण्यात आले आहेत. चित्रपटाच्या निर्मितीला 80 कोटी रुपये लागले आहेत. ओटीटीवर दिल्याने अजयला थेट 32 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. थिएटरमध्ये चित्रपट रिलीज केला असता तर 300 ते 500 कोटींच्या आसपास चित्रपटाचा बिझनेस झाला असता. परंतु अजयने व्यवसायाचा विचार करून 32 कोटी फायदा घेऊन दुसरा चित्रपट सुरु करणे फायदेशार असल्याचे दाखवून दिले आहे.

‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील एका घटनेवर आधारित आहे. अभिषेक दुधैया द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात अजयसोबत संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर हे कलाकार दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER