सनी देओलच्या मुलासाठी अजय देवगण बनवणार सिनेमा

Karan Deol - Ajay Devgan - Abhay Deol

नायकाच्या भूमिका करीत असतानाच अजय देवगणने (Ajay Devgan) निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकले होते. काही सिनेमांची त्याने निर्मिती केली. त्यानंतर त्याला दिग्दर्शन करावे असेही वाटू लागले आणि त्याने दिग्दर्शनासही सुरुवात केली. दिग्दर्शक म्हणून त्याचे सिनेमे विशेष प्रभाव टाकू शकलेले नसले तरी त्याने दिग्दर्शन करण्याची हौस काही सोडलेली नाही. सध्या अजय देवगण हैदराबादमध्ये मे डे या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्यात व्यस्त आहे. यासोबत अजय देवगणने सनी देओलचा मुलगा करण देओल (Karan Deol) याच्यासाठीही सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. साऊथच्या एका हिट सिनेमाची ही रिमेक असून यात करणसोबत त्याचा काका अभय देओलही दिसणार आहे. काका-पुतण्याची ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अभय देओल हा सनीचा चुलत भाऊ आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलुगू भाषेत ‘ब्रोशेवरेवरूरा’ नावाचा एक क्राइम कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे. हा सिनेमा चांगलाच हिट झाला असून याची हिंदी रिमेक करण्याचे अधिकार अजय देवगणने घेतले आहेत. या सिनेमासाठी करण देओल आणि अभय देओल यांना साईन करण्यात आलेले आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देवेन मुंजाळवर सोपवण्यात आलेली आहे. देवेन ने यापूर्वी शाहरुख खानच्या ‘चलते-चलते’ आणि ‘ओम शांति ओम’ सिनेमात सहाय्यक म्हणून काम केलेले आहे. त्याने आजवर स्वतंत्ररित्या एकही सिनेमा दिग्दर्शित केलेला नाही. दिग्दर्शनाचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे.

‘ब्रोशेवरेवरूरा’ तीन मित्रांची कथा असून तिघेही मित्र काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांच्याकडून नेहमी चुका होत असतात. या चुकांमुळेच त्यांच्यावर कोणते संकट गुदरते आणि त्यातून ते कसे मार्ग काढतात ते या सिनेमात दाखवण्यात आलेले आहे. सिनेमात करण आणि अभयला महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. याशिवाय आणखी काही कलाकार आणि नायिकांचा शोध सुरु करण्यात आला असून त्यांचीही घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

सनीने करण देओलला ‘पल पल दिल के पास’मधून लाँच केले होते. पण हा सिनेमा काही चालला नव्हता. त्यानंतर आता संपूर्ण देओल कुटुंबिय अनिल शर्माच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या ‘अपने 2’ मध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER