ऐतिहासिक महत्वप्राप्त असलेला हरिश्चंद्र गड किल्ला

Harishchandra Gad killa

पश्चिम घाटातील सह्य पर्वत रांगेतील भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड या किल्ल्याचा इतिहास हा ज्ञानेश्वर माऊलीच्या समकालीन घटनांची आठवण करून देणारा आहे, तर या परिसरातील भूगोल हा ऊन, पाऊस, वारा आणि थंडी यांचा सतत अनुभव देणारा आहे. हरिश्चंद्रगड हा पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. सह्याद्री पर्वताच्या माळशेज घाटाजवळ उभा असणारा हरिश्चंद्र गडाचा उंच डोंगर अभ्यासण्यासारखा आहे. हरिश्चंद्र गडाची समुद्रसपाटीपासून उंची १४२४ मीटर आहे.

हरिश्चंद्र गडाला पौराणिक इतिहास आहे. तसेच मुघल आणि मराठ्यांच्या समकालीन इतिहास देखील आहे. साडे तीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या हरिश्चंद्र गडाचा उल्लेख प्राचीन अग्नि पुराणात आणि मत्स्य पुराणात आहे. मोगल आणि कोळी महादेव यांच्या संघर्षात आदिवासी कोळी महादेव समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला आणि त्यानंतर इ. स. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला. आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्र गडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती, असे ही काही दंत कथानुसार सांगण्यात येते.

सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत हरिश्चंद्रगड हा वेगळा आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे येथे तटबंदी नाहीत. परंतू या अजस्त्र डोंगरावर काही प्राचीन लेणी आहेत.तसेच शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे. हरिश्चंद्र गडावरून जुन्नरच्या दिशेस शिवनेरी, हडसर, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र आणि सिद्धगड हे किल्ले दिसतात. या गडावर किल्ल्याचे केवळ अवशेष आहेत. काही मंदिरे आहेत. लेण्या आहेत. पाण्याचे टाके आहेत. परंतु या परिसरातील निसर्गाचे सौंदर्यच आपले मन प्रसन्न करते.

हरिश्चंद्र गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे तोलार खिंड, हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, कोकणकडा आणि तारामती शिखर. वर्षातील इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात या गडाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य खुप जास्त मनमोहक दिसते. त्यामुळेच पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. या गडाच्या सर्वात उंच ठिकाणावरून परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक खास गर्दी करतात. तारामती या गडावरील सर्वोच्च शिखरावरून परिसरातील नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड पर्यंतचा निसर्ग पाहता येतो. तसेच डोंगराच्या कपारीत कोरलेल्या विविध लेण्या, काही उभारलेल्या लेण्या, मंदिरे तसेच चित्तथरारक गडाची वाट यामुळे एकूणच हरिश्चंद्र गडाची दुर्गभ्रमंती आपल्या कायम लक्षात राहते.