मालिकांमध्ये मास्कची ऐशीतैशी

Yeu Kashi Tashi Me Nandayla - No Mask - Maharashtra Today

मालिकेची कथा प्रेक्षकांना अगदी त्यांच्या घरात घडतेय अशी वाटली पाहिजे यासाठी लेखकमंडळी पेनातील शाई खर्ची घालत असतात. म्हणूनच तर प्रेक्षकांच्या घरी दिवाळी असते तेव्हा मालिकांमधील घरंही उजळलेली असतात. आपल्याघरी बाप्पा येतात तेव्हा पडद्यावरची नायिकाही मोदकाच्या तयारीला लागलेली असते. गुढीपाडवा असो किंवा रंगपंचमी इतकच नव्हे तर जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हाही मालिकेतील सीनमध्ये त्याचे पडसाद उमटले. थोडक्यात काय तर मालिका आजच्या काळातील असेल तर त्यामध्ये वास्तवातील धागे जुळलेले दाखवून प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची संधी दवडली जात नाही. पण ज्या कोरोनामुळे सहा महिने मालिका आहे तिथे थांबल्या, सगळी आर्थिक गणितं बिघडली त्या कोरोनानंतरच्या नियमावलीला मात्र मालिकांच्या सीनमध्ये डच्चू दिल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेतील आऊटडोअर सीनमध्ये मास्कची ऐशीतैशी असल्याचे दिसतेय. एकीकडे सणउत्सवाच्या निमित्ताने मालिका वास्तववादी होतात पण कोरोनाची काळजी घेण्याच्या नियमावलीचा मात्र मालिकांच्या टीमला विसर पडला आहे. यावरून काही मालिका प्रेक्षकांकडून टिकेचा विषय बनत आहेत.

येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Me Nandayla) या मालिकेतील नायिका ही अंबरनाथला राहतेय तर नायक मुंबईत राहतो. या निमित्ताने या मालिकेत अंबरनाथ ते मुंबई प्रवासातील काही सीन दाखवण्यात आले आहेत. गेल्याच आठवडय़ात या मालिकेत लोकलट्रेनच्या प्रवासाचा सीन दाखवण्यात आला होता. मात्र ट्रेनच्या डब्यातील एकाही प्रवाशाने मास्क वापरलेला नव्हता. इतकेच नव्हे तर मालिकेच्या नायक व नायिकेलाही मास्क लावल्याचे दाखवले नाही.

राजा राणीची गं जोडी या मालिकेतील सुजित ढाले पाटील याच्या हॉटेलमधील सीनमध्येही मास्कचा विसर पडल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या पाहिले न मी तुला या मालिकेत बहुतांशी सीन हे आऊटडोअरचे असूनही मास्कचे दर्शन होत नाही. फक्त या मालिकेतील खलनायक समरप्रतापच्या कंपनीतील शिपाई भोपे मास्क वापरतो पण तो मास्क कधीच्या त्याच्या तोंडावर नसतो तर कायम हनुवटीवर असतो. याच मालिकेतील नायक अनिकेत जेव्हा नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी फिरत असतो तेव्हा त्याने मास्कचा वापर केला नव्हताच तसेच जेव्हा तो कॅबड्रायव्हर म्हणून काम करत असतानाही त्याने मास्क लावलेला नाही. आई कुठे काय करते या मालिकेत अरूंधती, आप्पा मॉर्निकवॉकसाठी बागेत फिरायला जातात तेव्हा त्यांनी मास्क वापरला पाहिजे याचे भान नाही. राजा राणीची ग जोडी या मालिकेत सध्या संजीवनीला पोलिसभरतीचे ट्रेनिंग रणजित देत आहे. यासाठी मैदानावर त्यांचा सराव सुरू असताना मास्क कुठेच दिसत नाही. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील काही ऑनरोड सीनमध्ये मास्क घातल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच शुभमंगल ऑनलाइन या मालिकेच्या सुरूवातीच्या काही एपिसोडमध्येही मास्कचा वापर झाला होता. अग्गंबाई सूनबाई या नव्या मालिकेतही मास्कचा वापर दिसत नाही. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत नायिका लतिका ज्या बँकेत काम करते तिथे ना कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मास्क दिसतो ना ग्राहकांच्या . अभिमन्यू, दौलत यांच्या ट्रेनिंगच्या सीनमध्येही मास्कला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये स्थान दिलेले नाही.

अनेकदा समाजाला संदेश देण्यासाठी मालिकांचा उपयोग केला जात असतो. पण कोरोना नियमावलीच्या बाबतीत मात्र मालिका एक पाऊल मागे आहेत. खरेतर कोरोना लॉकडाउनचा फटका मालिकाविश्वाला बसला होता. लॉॅकडाउननंतर मालिकांचे शूटिंग सुरू झाल्यावर सेटवर सगळी काळजी घेतली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. पण प्रत्यक्ष मालिकेतील सीनमध्ये कोरोनाची नियमावली पाळली जात नाही यावरून मालिका ट्रोल होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER