
पुणे : दररोज होणाऱ्या इंधनाच्या दरवाढीने सगळे जण त्रस्त आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतींची विविध वस्तूंच्या महागाईशी तुलना सुरू आहे. यात एक गमतीदार गोष्ट लक्षात आली, विमानाचे इंधन ट्रकच्या डिझेलपेक्षा स्वस्त आहे !
डिझेलदेखील ८५ रुपयांच्या घरात पोहचले आहे. मात्र, विमानाचे इंधन डिझेलपेक्षा सुमारे ४० टक्के स्वस्त म्हणजे ५५ रुपये लिटर आहे. कारण डिझेलवरचे कर!
केंद्रीय बजेटमध्ये जाहीर झालेला कृषी अधिभार फक्त पेट्रोल (Petrol) व डिझेलवर (Diesel) आकारण्यात आला आहे, विमानाच्या इंधनावरदेखील लावला गेलेला नाही. त्यामुळे ट्रकच्या इंधनापेक्षा विमानाचे इंधन ४० टक्के स्वस्त (५५ रुपये लिटर) आहे. विकासकामांसाठी कर देण्याचा भार पेट्रोल- डिझेल वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर आणि वाहतूकदारांवरच का लावला जातो? विमानाने प्रवास करणारे त्यांच्यापेक्षा गरीब आहेत का? असा प्रश्न ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर यांनी केला आहे.
विवेक वेलणकर म्हणालेत, महाराष्ट्र राज्य सरकारचा व्हॅट विमानाच्या इंधनावर डिझेलवर लावलेल्या व्हॅटपेक्षा जास्त असूनसुद्धा दरांमध्ये ही तफावत आहे. केंद्र सरकारने किमान डिझेलवरील कर व अधिभार विमानाच्या इंधनावर लागणाऱ्या करांच्या पातळीवर आणावा. पेट्रोल आणि डिझेलवर करांचा भार खूप जास्त आहे.
पेट्रोलवर ६० रुपये तर डिझेलवर ५४ रुपयांचा कर आकारला जातो. त्या प्रमाणात विमानाच्या इंधनावर अधिभार लावण्यात आलेला नाही. विमानाचं इंधन स्वस्त आणि माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रक, बसेसचे इंधन महाग ही विसंगती आहे, असे वेलणकर म्हणालेत.
पेट्रोल-डिझेल १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकते
केंद्राचा पेट्रोलवरचा टॅक्स साधारण ३३ रुपये आणि राज्य सरकारचा २७ रुपये आहे. दोघांचीही हे कर कमी करायला हरकत आहे. डिझेलच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी आहे. कारण डिझेलवर केंद्राचा ३० ते ३१.५० रुपये आणि राज्य सरकारचा फक्त २० रुपये अधिभार आहे. केंद्राचा कर कमी व्हायला पाहिजे. परंतु, गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रुपये कर वाढविले आहेत. केंद्र आणि राज्याने फक्त गेल्या वर्षभरातील वाढविलेले कर कमी केले तर आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकतात, अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला