दिल्लीतील हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत-शिया वक्फ बोर्ड

AIMIM leader Waris Pathan responsible Delhi violence-Shia Waqf Board

नवी दिल्ली : दिल्ली आंदोलनाने पेटली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २७ जणांचा बळी गेला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरून आंदोलक आक्रमक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ईशान्य दिल्लीत उफाळून आलेल्या हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप वसिम रिझवी यांनी केला आहे.

तसेच वारिस पठाण यांच्या “आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी आहोत.” या वक्तव्याचे पडसादही दिल्लीत उमटत आहेत, असंही वसिम म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे, शाहीनबागमध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनावरही रिझवी यांनी टीका केली आहे. शाहीनबागमधील महिलांच्या अडाणीपणामुळे दिल्लीत हिंसा घडून येत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकार, सीएए आणि देश आपलाच आहे. आपसात भांडू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे.

काँग्रेसच्या विषाचा प्याला पिऊ नये. काँग्रेसच्या जाळ्यात अडकू नका, असंही ते म्हणाले आहेत. दिल्लीच्या ईशान्य भागात गेल्या सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकीच्या गोळ्या, ब्लेड्स, दगडं, टोकदार वस्तू, खिळे यांच्या लागण्यामुळे या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांपैकी १४ जणांचा मृत्यू हा बंदुकीच्या गोळ्या लागल्यामुळे झाला आहे, अशी माहिती जीटीबी रुग्णालय आणि जग प्रवेशचंद्र रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

दिल्लीतील हिंसाचारावरून पत्रकारांनी प्रश्न विचारले असता जावडेकर पत्रपरिषद सोडून निघून गेले