आता एमआयएमने दिला राष्ट्रवादीला धक्का ; ‘या’ नेत्याला जाहीर केली उमेदवारी

Asaduddin Owaisi -Sharad Pawar

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे . आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही पक्षाची गळती सुरूच असून आता वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमने राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला आहे. मालेगाव मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते मौलाना मुफ्ती इस्माईल यांना एमआयएमकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे इस्माईल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली . आतापर्यंत एमआयएमकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे, नांदेड उत्तरमधून मोहम्मद फिरोज खान लाला यांना तर मालेगाव मध्यमधून  मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना विधानसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असणारी आघाडी एमआयएमकडून तोडण्यात आली आहे. तसेच विधानसभेसाठी उमेदवारांची पाहिली यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे.

वंचित आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली असल्याचे समोर आले आहे. कारण आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असं हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.