सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरले – रोहित पवार

Rohit Pawar - AIIMS - Sushant Singh Rajput

अहमदनगर : बॉलिवूडचा (Bollywood) दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरण राज्याच्या राजकारणात चांगलेच गाजले. सुशांतसिंहची आत्महत्या नसून हत्या केली असल्याचा आरोपदेखील झाला. त्यावरून मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कामगिरीवर संशयदेखील व्यक्त करण्यात आला व हे प्रकरण सीबीआयकडे गेले.

मात्र, या प्रकरणावर एम्सच्या डॉक्टरांनी आज मोठा खुलासा केला आहे. ‘एम्स’ (AIIMS) रुग्णालयाच्या अहवालानुसार सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. महाराष्ट्र आणि पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहे. “बिहार निवडणुकीसाठी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर जाहीर माफी मागावी”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात ट्वीट करत त्यांनी विरोधकांना टोला हाणला आहे. तसेच सत्यमेव जयते असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे.

एम्सच्या टीमने पोस्टमार्टम व व्हिसेरा रिपोर्टचा अभ्यास करून तो अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. या अहवालामध्ये हत्येचा दावा फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केली यावर शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे एम्सकडून आलेल्या या माहितीनंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवाय महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे नाव देखील या प्रकरणात जोडण्यात आल्याने याला राजकीय वळण लागले होते. एम्सच्या अहवालानंतर शिवसेनेनेही प्रतिक्रिया देताना विरोधकांना सुनावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER