राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अहमदनगरचा पुढचा महापौर शिवसेनेचा?

sharad pawar-uddhav thackeray

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत (Ahmednagar Municipal Corporation) स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा पेच अखेर सुटला आहे. शिवसेनेने (Shivsena) दिलेला शब्द पाळल्याने भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायी सभापतिपदी निवड झाली आहे. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पत्र लिहून आभार मानले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीशी असलेले मतभेद मिटविण्याचे काम आता शिवसेनेत नव्याने दाखल झालेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख करीत आहेत.

मागील बैठकीत गडाख यांनी आगामी महापाैर शिवसेनेचाच होईल, असा दावा केला होता. काल झालेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने घेतलेली माघार हा एक भाग असल्याचे मानले जाते. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांचे संख्याबळ शिवसेनेचे जास्त होते. असे असताना त्यांना महापाैर पक्षाचा करता आला नाही. शहरातील शिवसेनेचे तत्कालीन नेते व राष्ट्रवादीचे नेते यांच्यात मतभेद होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी राजकीय खेळी करीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत महापाैर भाजपचा झाला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळेच सध्या महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी अंमल मात्र राष्ट्रवादीचाच आहे, असेच मानले जात होते.

मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आले. त्यामुळे या पक्षाची युती राज्यभरातील लहान-मोठ्या निवडणुकांतही दिसून आली. याचेच प्रत्यंतर नगरच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीतही दिसून आले. महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते समन्वयाने काम करतात. त्यामुळे त्यांच्या आदेशाने नगरमध्येही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेचा नगरसेवक स्थायी समितीचा सभापती होऊ शकला असता. परंतु राष्ट्रवादीने तसे न करता भाजपचा नगरसेवक फोडून त्याला उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेने माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर स्थायीचे सभापती झाले. आगामी काळात शिवसेनेला महापाैरपद मिळावे, यासाठीच आजचे स्थायीचे सभापतिपद राष्ट्रवादीकडे देऊन शिवसेनेने खेळी खेळली, असे मानले जाते.

स्थायी समितीच्या सभापतिपदाचा विषय थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे गेला होता. त्यांच्या आदेशानेच शिवसेनेने माघार घेतली. शिवसेनेचे नगरसेवक जास्त असल्याने आगामी काळात महापाैर निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापाैर होईल, असाच अर्थ कालच्या घडामोडीचा होतो. दरम्यान, अहमदनगरचे महापाैरपद हे अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. अशा प्रकारचा उमेदवार शिवसेनेकडे आहे. रोहिणी संजय शेंडगे या शिवसेनेच्या उमेदवार महापाैरपदाच्या दावेदार होऊ शकतात. भाजप व राष्ट्रवादीकडे असा उमेदवारच नाही. त्यामुळे आगामी निवडीत शेंडगे यांनाच संधी मिळू शकेल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER