‘मुख्यमंत्री साहेब, आमच्यासाठी एवढं करा…’ कामगाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

CM Uddhav Thackeray

अहमदनगर : केंद्र सरकारनं कामगारांसंबंधीचे कामगार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत नुकतेच मंजूर केले. मात्र या विधेयकाला कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. एवढंच नाही तर कामगारांनी आंदोलने केली. मात्र अद्यापही केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही.  राज्य सरकारने पुढाकार घेऊन किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये, अशी विनंती करणारे पत्र एका कामगाराने  थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. तुषार बाळासाहेब सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले आहे .

सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेले पत्र :

केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांविरोधात आहे. आधीच कायदे कामगारांचे बाजूचे नसताना आता नवीन कामगार सुधारक विधेयक पारित करून सरकार कामगारांना कंपनी व्यवस्थापन व मालकांच्या हातचे बाहुले बनवू इच्छित आहे काय? हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर कारखाना व्यवस्थापक, कारखाना मालक हे कामगारांना अक्षरश: आपले गुलाम बनून राबवून घेतील, कामगारांची मुस्कटदाबी होईल, तसेच कामगारांना आपले हक्क, अधिकार मागता येणार नाहीत. आज कामगार संघटित होऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत त्याला पुढील काळात संघटित होता येणार नाही.

ज्या बोटावर मोजण्याइतक्या प्रामाणिक कामगार संघटना आहेत त्या मोडीत निघतील. मी एक सर्वसामान्य कामगार आपणास आग्रहाची विनंती करीत आहे की, जर केंद्र सरकारने कायदा अमलात आणला, लागू केला तर आपण हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये. केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) या निर्णयानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य कामगार अतिशय भयभीत झाला आहे. आपण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य कामगारांना आश्वासन द्यावे, की मोदी सरकारने केंद्रात हा कायदा लागू केला तरी महाराष्ट्रातील आघाडी सरकार हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही. जनतेला आपण असे आश्वासन दिले तर पुढील काळात सर्वसामान्य गोरगरीब कामगार हा नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील. – असे कामगार तुषार सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER