पुढचा महापौर शिवसेनेचा व्हावा यासाठी घडून आली एकी

अहमदनगर : महापालिकेतील (Ahmednagar Municipal Corporation) स्थायी समिती सभापती तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून अहमदनगरच्या शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. सुमारे वर्षभरापासून गटबाजीत विखुरलेली शिवसेना पुन्हा एकीच्या दिशेने प्रवास करू लागली असून, दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी जुन्या-नव्या नेत्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न विक्रम राठोड यांनी केला. तर काल दुपारी संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत एकत्र बैठक घेऊन यापुढे आरोप-प्रत्यारोप बंद करण्याचे सांगण्यात आले. पुढचा महापौर शिवसेनेचाच, असा नारा देत पक्षशिस्तीचे धडे देण्यात आले आहे. शिवसेनेत चव्हाट्यावर आलेल्या वादाला संपवण्यासाठी अखेर विक्रम राठोड व वरिष्ठ पातळीवर यश आले आहे. गुरुवारी शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचे मनोमिलन करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात आले. यावेळी भाऊ कोरगावकर म्हणाले, काही कारणांमुळे पक्षात थोडीशी नाराजी होती.

त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी मी, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, विक्रम राठोड या सर्वांनी बैठक घेतली. विक्रम राठोड यांनी प्रत्येक नगरसेवकासोबत संवाद साधला होता. तसेच आजच्या बैठकीत एकमेकांबद्दल जे क्लेश होते, ते दूर झाले आहेत. आता सर्वच लोक एकत्र दिसतील. आपण आपापसात भांडतोय, हे सर्वांना समजले आहे. त्यामुळे येथून पुढे तसे काही दिसणार नाही.यावेळी पक्षशिस्त मोडणाऱ्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा सज्जड इशाराही देण्यात आला असून पुढचा महापौर शिवसेनेचाच करायचा, असा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीला संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, युवासेनेचे विक्रम राठोड, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, ज्येष्ठ शिवसैनिक अंबादास पंधाडे यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER