मनसेची दारूविक्रीबाबत भूमिका : नगरमध्ये केलेल्या आंदोलनामुळे चर्चेला उधाण

मुंबई : गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात दारूची दुकाने सुरू करा, हॉटेलमधून पार्सल सुरू करा, अशी विनंती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारला केली होती. या वर्षी मात्र मनसेची ही भूमिका बदलल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत . दारूच्या दुकानांतून पार्सल सेवा सुरू असल्याच्या निषेधार्थ मनसेने (MNS) महाविकास आघाडीच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दारूने अभिषेक घातला. हे सरकार दारूप्रेमी असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे यांनी हे आंदोलन केले. कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व व्यापार ठप्प आहेत.

बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून लोकांकडे दारू घ्यायलासुद्धा पैसे राहिले नाहीत. अशाही परिस्थितीत सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. बाकीचे व्यवहार ठप्प, ज्यांना मदत जाहीर केली, त्यांना ती मिळत नाही अशा परिस्थितीत सरकार मात्र दारूला परवानगी देत आहे. अशा दारूप्रेमी सरकारचा आम्ही दारूचा अभिषेक करून निषेध केला आहे. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा मनसेच्यावतीने येणाऱ्या काळात रास्ता रोको आणि अन्य प्रकारचे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भुतारे यांनी दिला आहे.

दरम्यान गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच ठाकरे यांनी याच्या उलट भूमिका घेतली होती. त्यावेळीही दारूची दुकाने बंद होती. तेव्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ती सुरू करण्याची मागणी केली होती. वर्षभरानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याच्या उलट मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका कोणती, असा प्रश्न निर्माण होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button