अहमद पटेल यांचा नवीन जावईशोध

मुंबई : भारतातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराची दिवसेंदिवस पातळी किती खाली घसरत चालली ते सांगायला नकोच. यात सर्वच राजकीय पक्ष दोषी असले. तरी राष्ट्रीय दर्जा हरवून घेणाऱ्या पक्षांनी तारण्याची दाखविण्याची गरज असते. स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांपैकी जवळपास ६० वर्षे सत्ता उपभोगलेल्या पक्षाकडून तर त्याची जास्त अपेक्षा असते. दुर्दैवाने त्याचा अभाव दिसतो आहे.

इतका प्रदीर्घ काळ सत्तेत राहूनही सदगदानी नसलेल्या काँग्रेस पक्षाला येन केन प्रकारे यंदा सत्ता हस्तगत करण्याची घाई झाल्यामुळे सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची जेवढी बदनामी करता येईल तेवढी करायचीच असे ठरवून त्या पक्षाचे नेते कार्यरत झाले आहे. त्याला पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हेही अपवाद नाहीत. किंबहुना भाजपविरोधात जेवढे काही रान उठवता येईल तेवढे उठवायचे या हेतूने त्यांनी प्रारंभी राफेल प्रश्नावरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यावर आरोपांचे सत्र सुरू केले. मोदी यांनी हजारो रूपयांचा गैरव्यवहार केला असे आरोप करीत ते सुटले आहेत. ते करताना, युपीए सरकारच्या १० वर्षांत स्पेक्ट्रम कोळसा, कॉमनवेल्थ आदी घोटाळ्यांत किती पैसा गेला आणि तो कोणी खाल्ला याची उत्तरे देण्याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला.

एखादी गोष्ट वारंवार सांगितली गेली की ती लोकांना खरी वाटू लागते असे म्हटले जाते. त्यामुळे राफेल प्रकरणात खरेच घोटाळा आहे की काय अशी शंका उत्पन्न होऊ लागली. सुप्रीम कोर्टाने, कॅगने गैरव्यवहार नाही असे सांगूनही काँग्रेसचे पानिपात संपले नाही. उलट ‘चौकीदार चोर है’ अशी टीका राहुल गांधी व त्यांचे सहकारी करू लागले. एवढेच नाही तर मोदी हे लष्कराला आपल्या वैयक्तिक हितासाठी वापरून घेत आहेत असे आरोप केले. तेव्हा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी बोफोर्सचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.

राहुल यांचे पिताश्री राजीव यांच्या काळात झालेला हा व्यवहार काँग्रेसपक्षाला प्रारंभापासून छळत आलेला आहे. मोदींनी तो परत उकरून तर काढलाच पण गांधी कुटुंब लष्कराच्या सोयी सवलतींचा कसा गैरवापर करीत याचा भंडाफोड केला. राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबासह तसेच मित्र परिवाराला घेऊन आयएनएस विक्रांत नौकेवरून जलपर्यटनाला गेले होते याची माहिती मोदी यांनी आपल्या प्रचारादरम्यान दिली. त्यावरून कोण सरकारच्या जिवावर मजा मारत होते हे स्पष्ट झाले. आपले आरोप आपल्याच अंगलट येत असल्याचे बघितल्यावर काँग्रेसला बॅकफूटवर जाणे भाग पडले.

बोफोर्स प्रकरणावरून नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर भ्रष्टाचारी असल्याचा जो आरोप केला त्याला राहुल गांधी यांनी अद्यापही उत्तर दिलेले नाही. ते देतील किंवा नाही हे सांगता येत नाही. परंतु, राजाहून राजनिष्ट असल्याचा सतत आव आणणारे गांधी घराण्याचे मानसबदार अहदमद पटेल यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ते देताना राजीव हत्येला भाजप जबाबदार असल्याचा जावईशोधही त्यांनी लावला. राजीव गांधी यांच्या जिवाला धोका आहे हे माहिती असतानाही व गुप्तहेर खात्याने माहिती दिल्यानंतरही व्ही.पी. सिंह सरकारने त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवली नाही. असे सांगताना या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता, म्हणून भाजपही त्याला जबाबदार असा बादरायण संबंध त्यांनी जोडला. तो वाचल्यावर भाजपच्या सोडाच खुद्द काँगेस नेत्यांनाही हसावे की रडावे असा प्रश्न पडेल. विशेष म्हणजे राजीव गांधी यांची जेव्हा हत्या झाली त्यावर्षी पंतप्रधानपदी व्ही. पी. सिंह नव्हते तर जनता पक्षाचे चंद्रशेखर हे (काळजीवाहू पंतप्रधान) होते याची सोनियांच्या या राजकीय सल्लागारांना आठवण करून द्यायला हवी.

– चंद्रशेखर जोशी