इंग्रजांच्या कुटील डाव सर्वात आधी अहिल्यादेवींनी ओळखला,पेशव्यांना पत्र लिहून सावध भूमिका घेण्याचं केलं होतं आवाहन!

Maharashtra Today

कार्यकर्तूत्वामुळं जिवंतपणीच देवत्व प्राप्त करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर मॉंसाहेबांबद्दल आजही संपूर्ण भारतात प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो. अहमदनगरच्या जामखेड तालूक्यात ३१ मे १७२५ला चौंडी गावात जन्मलेल्या अहिल्यादेवी (Ahilya Devi) पुढं चालून माळवा साम्राज्याच्या महाराणी बनल्या.

अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे (Mankoji Shinde) गावचे पाटील होते. जेव्हा स्त्री शिक्षणाचा कुणी विचारही केला नसेल तेव्हा त्यांनी अहिल्यादेवींना शस्त्र आणि शास्त्राचे शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. मोहीमेवरुन पुण्याला परतताना पेशवे बाजीराव आणि सुभेदार मल्हरराव होळकर यांचा मुक्काम चौंडी गावात पडला. तेव्हा मल्हाररावांना अहिल्यादेवींच्या रुपात स्वतःची सुन दिसली. आणि अहिल्यादेवी होळकर राजघराण्याच सुनबाई झाल्या.

१७३३ला जेव्हा अहिल्यादेवींचा खंडेरावांशी विवाह झाला तेव्हा त्यांच वय मात्र आठ वर्षे होतं. या कोवळ्या वयात त्या माळव्यात आल्या. त्यांच्या आनंदी जीवनाला पहिला धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांच्या पती खंडोरावांना कुंभेरीच्या वेढ्यात वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी अहिल्या मॉंसाहेब फक्त २१ वर्षांच्या होत्या.

पतिच्या मृत्यूनंतर त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. पण थोरले सुभेदार मल्हाररावांनी त्यांना रोखलं. त्यांनी अहिल्यादेवींना धीर दिला आणि पुढं राजकारभार चालवण्याची जबाबदारी देखील दिली. १७६६ला थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला. आता माळव्याची जबाबदारी अहिल्यादेवींवर होती. इथून सुरुवात होणार होती भारताच्या सुवर्ण इतिहासाच्या जिर्णोद्धाराची.

दुःखाच्या डोंगरातून वाट काढत अहिल्यादेवी सावरतच होत्या की तितक्यात ५ एप्रिल १७६७ला मॉंसाहेबांचे पुत्र मालोजीराव यांचं निधन झालं. त्यांना या दुःखातून सावरायचं होतं. थोरले सुभेदार गेले. त्यांचे चिरंजीव अहिल्यादेवींचे पती युवराज खंडेराव गेले आणि आता पोटच्या गोळ्याला अग्नि देताना पाहिलं. एखाद्या स्त्रीनं खचून जावं आणि परत उभारी घेवू नये इतकी वाईट अवस्था व्हावी अशी वेळ त्यांच्यावर ओढावली पण त्यातून ही त्यांना सावरण भाग होतं.

एक मालोजी त्यांनी गमावला पण आता संपूर्ण मावळा साम्राज्याची माता त्यांना व्हायचं होतं. माळवा लुटण्याचे आणि लाटण्याचे शिंदे, पेशव्यांचे डाव त्यांनी उधळून लावले. वेळ पडली तर स्त्रीयांची फौज घेवून मैदानात उतरु अशी तंबी देखील राघोबादादाला दिली. प्रजा उघड्या डोळ्याने हे बघत होती. महाराणीचा पुण्यश्लोक होण्यापर्यंतचा प्रवास. अनेकदा हत्तीवर स्वार होवून हातात धनुष्यबाण घेवून शत्रु सैन्याला सळो की पळो करणाऱ्या अहिल्यादेवी आजही भारतीयांच्या मनात जिवंत आहेत.

सुभेदार तुकोजीरावांना दत्तक घेवून त्यांना सेनेचं नेतृत्व दिलं. माळवा प्रांताचा चारी दिशांना विस्तार तुकोजीरावांनी केला. ते कुशल योद्धे, मात्तब्बर राजकारणी आणि प्रभावी शासक होते. अहिल्यादेवी राजकारभारावर नजर ठेवून होत्या पण सबंध भारतावर त्यांची नजर होती. त्यांच्या मायाळू स्वभावानं आणि दातृत्वाच्या विचारानं कधीच राज्याच्या सीमांची पर्वा केली नाही.

अहिल्यादेवींची दुरदृष्टी कमालीची होती. इंग्रजांचा उद्देश्य हा व्यापार करण्याचा नसून भारत जिंकण्याचा आहे हे त्यांनी सर्वात आधी ओळखलं होतं. इंग्रजांबद्दल पेशव्यांना सावध करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पत्रात लिहतात,

“चित्त्यासारख्या शक्तीशाली प्राण्याला संपूर्ण ताकदीनं प्रतिकार करुन मारता येईल पण अस्वलाचा खात्म करणं अवघड असतं. त्याला मारण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरच वार करावा लागतो. आणि जर कुणी व्यक्ती त्याच्या तावडीत सापडला तर तो त्याला गुदगुल्या करुन जीवे मारेल. इंग्रज लोक ही असेच आहेत. त्यांच्यावर विजय मिळवणं सहज सोप्पे कार्य नाही.”

अहिल्यादेवींच्या कार्यकाळात माळव्याचा चेहरा मोहरा बदलला. लहान सहान खेड्यांना कसब्याचं रुप आलं. कसब्यांची शहरं झाली. आजचं इंदौर भारतातलं सर्वात सुंदर शहर आणि स्वच्छ शहर आहे याचं श्रेय अहिल्यादेवींसह समस्त होळकर राजघराण्याला जातं.

त्यांनी मोठ्यप्रमाणात दानधर्म केला. बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार केला. आयोध्या, हरिद्वार, काशी, द्वारका, बद्रिनाथ या शहरांना पुन्हा गतवैभव प्राप्त करुन दिलं. शहरांची बांधणी केली.या शहरांना उद्योग, कला, साहित्य आणि संगिताचे केंद्रबिंदू बनवलं.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी वयाच्या सत्तरीपर्यंत माळवा आणि भारतभरातील रयतेची पोटच्या मुलांप्रमाणं काळजी घेतली. १३ ऑगस्ट १७९५ला त्यांनी देह ठेवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER