अकोल्यात कृषी विद्यार्थ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचा ताफा अडवला

अकोला : कृषी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करणे आणि शैक्षणिक व इतर शुल्क वसतिगृह शुल्कासह कमी करून बंद झालेली शिक्षक सवलती सुरू करण्यात याव्यात या व इतर मागण्यांसाठी डॉ.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळच ताफा अडवला. पालकमंत्री बच्चू कडू आज आपल्या नियोजित दौऱ्यावर अकोल्यात आले होते. एमआयडीसीतील कार्यक्रम आटपून ते पुढील कार्यक्रमासाठी जात होते.

शिवसेनेच्या सागवे विभागातील २३ शाखाप्रमुखांचे राजीनामे

यामुळे अमरावती-अकोला मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जलसंपदा आणि लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे गुरुवारी अकोला दौऱ्यावर आहेत. एमआयडीसी असोसिएशनचा कार्यक्रम आटपून ते एका खाजगी कार्यक्रमाला निघाले होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोर १५-२० विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनासमोर जाऊन ताफा अडवला. यावेळी विद्यार्थी असल्याचे पाहून पालकमंत्री बच्चू कडू हे स्वतः गाडीतून उतरले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घेतल्या आणि यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.