केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही ; चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Sharad Pawar & Chandrakant Patil

मुंबई : केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. त्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. ते पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध (agricultural laws) दिल्लीच्या सीमेवर गेल्या १० दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पण काही केल्या हा कायदा रद्द होणार नाही, असं ठाम वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती, असे पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातूनही सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पण असं असलं तरी कायदा रद्द होणार नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आपण आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल.’ असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.

इतकंच नाही तर देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यावर चंद्रकांत पाटलांनी बोलताना भेटीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाही आहे. लोकशाहीत कोणीही भेट घेऊ शकतं. भेट घेत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असा टोला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER