उद्धव ठाकरे यांच्या कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी आंदोलन : किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Kirit Somiya Arrested

अलिबाग : भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जमीन घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणी करून ते अलिबाग येथे आंदोलन करत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाने २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या. मात्र २०२० पर्यंत या जमिनींवरील मालमत्ता आपल्या नावावर केल्या नाहीत. बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्ष त्यांनी वापरली. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केला नाही, या प्रकरणाची चौकशी करा या मागणीसाठी किरीट सोमय्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. त्यांनी पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता अडवला होता. पोलिसांनी रात्री आठच्या सुमाराला त्यांना ताब्यात घेतले.

दुपारी पावणे बाराच्या सुमारास किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्य सरकारविरोधात घोषणा देणे सुरु केले. उद्धव ठाकरेंच्या जमीन व्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी करत त्यांनी निदर्शनाला सुरुवात केली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाच जणांनाच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेता येईल असे सांगितले. मात्र, सर्व कार्यकर्त्यांना घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार यासाठी सोमय्या आग्रही होते. काही कार्यकर्त्यांनी बळजबरीने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

दुपारनंतर आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. सुरुवातीला मोजक्या कार्यकर्त्यांसह हे आंदोलन सुरू झाले होते. नंतर जिल्ह्यातील विविध भागातून भाजपाचे कार्यकर्ते आलेत. गर्दी वाढली. रात्री आठ वाजता पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

कोर्लईत जमीन घोटाळा झाल्याचे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केले आहे. त्यात दोषी कोण आहे याची चौकशी व्हायला हवी. १२ कोटी रुपये बाजारमूल्य असलेली मालमत्ता २ कोटीत कशी खरेदी करण्यात आली? हे या चौकशीतून समजले पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER