आघाडीचे सरकार डिसेंबरपर्यंतच, त्यानंतर भाजपची सत्ता; भाजप ‘किंगमेकर’चा दावा

Mahavikas Aghadi - Shivaji Kardile

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन चाकी सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच अस्तित्वात असेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची (BJP) सत्ता येईल, असा दावा भाजपमध्ये ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) हे फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिमंडळात होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेने जोर धरला आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) काँग्रेसशासित (Congress) नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास तयार नव्हते, या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला होता. त्यामुळे महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. परिणामी आता शिवाजी कार्डिले यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाविकासआघाडीचे सरकार पुढची पाच वर्षे सोडा, किती दिवस टिकेल, हे आता जनताच सांगेल. हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यवाणीची गरज नाही. पण महाविकासआघाडीचे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंत टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असे भाकीत कार्डिले यांनी वर्तविले. त्यांच्या या वक्तव्याच्या आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. मला भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षात जायचे नाही. माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही आणि मला त्याची गरजही नाही, अशी पुस्ती जोडत त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा दावाही खोडून काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER