तुमचे आंदोलन कुणाच्या विरोधात? संभाजीराजेंच्या आंदोलनावर शिवसेनेचे प्रश्नचिन्ह

Sambhaji Raje Chhatrapati - Arvind Sawant

मुंबई : ३४८व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संभाजी छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पहिला मोर्चा काढण्याची घोषणा केली. या आंदोलनाला भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मात्र या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंदोलन कुणाच्या विरोधात केले जात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का?; असा प्रश्न अरविंद सावंत यांनी संभाजीराजेंना केला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्याने पहिल्यांदाच थेट संभाजीराजेंनाच प्रश्न विचारल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

छत्रपती संभाजीराजे भाजपकडून राज्यसभेत खासदार म्हणून गेले आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला. संभाजीराजेंचा आम्ही मोठ्या मनाने आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की राज्य सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी आधी स्पष्ट केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना भाजपकडून (BJP) लक्ष्य केले जात आहे. त्यावरूनही सावंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करणे अत्यंत हास्यास्पद आहे. पर्यावरण चळवळीचे प्रणेते आदित्य ठाकरे हे जेव्हा मंत्री नव्हते, तेव्हा त्यांनी सागरी किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्य सरकारला प्लास्टिक बंदीचा कायदा लागू करावा लागला. ठाकरे घराणं हे निसर्गप्रेमी आहे. ज्यांनी काळ्या रात्री गोरेगावातील झाडांवर कुऱ्हाडी चालवल्या त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button