नीरा कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीसाठी, माढा मतदारसंघातील नेते आक्रमक

बारामती :- ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयावर माढा मतदारसंघातील नेते आक्रमक झाले असून नीरा देवघरचे पाणी पेटणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली.

‘मालिकेतील संभाजी महाराजांचे अटकेनंतरचे हाल दाखवू नये’, सेनानेते खोतकरांची मागणी

बारामतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या नीरा डाव्या कालव्याचा निर्णयही रद्द करण्यात आला असून या निर्णयामुळे भाजप नेत्यांचा डाव त्यांच्यावर उलटवण्यात पवारांना यश आले आहे. निरा – देवघरचे पाणी बारामतीला शरद पवारांनी वळवले असल्याचा ठपका ठेवून तत्कालीन भाजप सरकारला ते पाणी बंद करण्यास खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाग पाडले होते. त्यावेळी त्या प्रश्नावरून मोठे राजकारण तापले होते. परंतु, राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा घेण्यात आला आहे.

त्यामुळे दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यावर पुन्हा एकदा ‘दादा’ गिरी होत असल्याने यावरून राजकारण तापले असून बेकायदेशीर पाणी वापरास आपला विरोध असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. मंत्री मंडळात काल झालेला निर्णय हा अधिकृत आहे का नाही हे पाहून निर्णय घेऊ, असे सांगोल्याचे शिवसेना आमदार शाहजीबापू पाटील यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्यावर अन्याय करणार नाही, अशी भूमिका आमदार शाहजी पाटील यांनी घेतली आहे. ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी खासदार निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे का हे मला माहित नाही.

पण ज्या भागाला उन्हाळी पाण्याची आवश्यकता आहे. त्या भागाला पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका देशमुख यांनी घेतली आहे. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी झालेले पाणी वाटप हे समन्यायी नसून अन्यायी आहे, असा आरोप केला आहे. तसेच ‘पाण्यासाठी जन आंदोलन उभा करू, असा इशारा आमदार राम सातपुते यांनी दिला. तर दुसरीकडे पाण्यासाठी रस्त्यावर उतरू असा पवित्रा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांची कोंडी झाली असून पाणी पुन्हा माढा, सोलापूरला मिळणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.