महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे सरकार : मुख्यमंत्री

Again BJP-Shivsena allaince govt will be in Maharastra

धुळे :- हेच सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करेल असे राज्यातील जनतेला वाटत असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचे सरकारच सत्तेत येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात झाली असून यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

त्यामुळे आमच्या यात्रेनंतर अनेक पक्षांना उत्साह आला आहे आणि त्यांनी देखील यात्रा काढल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. काँग्रेसची भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्यामुळे त्यांची यात्रा आहे की नाही मला माहिती नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश असल्याची घोषणा मुख्यममत्र्यांनी केली आहे. ही यात्रा आतापर्यंत 43 विधानसभेत पोहोचली आहे. ही यात्रा धुळ्यानंतर जळगावच्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच या महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आत्तापर्यंत जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 240 कोटींची कामे झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर 10 हजार कोटी पेक्षा अधिक मदत खान्देशातील शेतकऱ्यांना मदत दिल्याचेही कबूल केले. सध्या देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये महाराष्ट्राचा समावेश असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचाही निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राच्या सामंजस्य कराराचा कन्वर्जन रेट 54 ते 60 टक्के आहे. देशातील सामंजस्य कराराच्या कन्वर्जन रेटपेक्षा आपला रेट जास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मोटार उद्योगात आलेल्या मंदीच्या संकटावर केंद्र सरकार लक्ष ठेऊन आहे. निश्चित यावर तोडगा काढला जाईल असेही ते म्हणाले.

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विशिष्ट काळात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून या आदेशानुसार सरकारकडून निश्चित योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.