तीन वर्षाच्या अबोल्यानंतर झाली घट्ट मैत्री

titiksha tawde & Sulekha Talwalkar

तीन वर्षे एकत्र एका मालिकेच्या निमित्ताने रोज सेटवर भेटायच्या या दोन अभिनेत्री. खरेतर तीन वर्षे त्या एकमेकींशी बोलतही नव्हत्या. त्या का बोलत नव्हत्या याचं कारण दोघींकडेही नाही. त्यातल्या ज्युनियर अभिनेत्रीला असं वाटायचं की आपण स्वतःला कसं बोलायचं आणि सिनियर अभिनेत्रीला वाटायचे की तिने आधी बोलावं. तीन वर्ष त्यांनी मालिकेतील संवाद सोडला तर एकमेकींशी काहीच गप्पा मारल्या नाही . पण जेव्हा सिरीयल संपली तेव्हा निरोपाच्या कार्यक्रमात त्यांचा संवाद झाला आणि मग त्यानंतर त्या अगदी घट्ट मैत्रीणि झाल्या. अफलातून गोष्ट आहे अभिनेत्री सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) आणि तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) यांच्या मैत्रीची .

सुलेखा तळवलकर ही दिल के करीब नावाचा एक हटके शो सादर करत असते आणि या निमित्ताने ती तिच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या इंडस्ट्री मधल्या कलाकारांशी गप्पा मारते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुलेखा आणि तितिक्षा यांच्या गप्पा त्यांच्या चाहत्यांना ऐकायला मिळाल्या. या गप्पांची सुरुवात झाली ती, तुला आठवतं का, आपण एकमेकींशी बोलत नव्हतो या वाक्याने. हे एकून त्यांचे चाहते अवाक झाले कारण सुलेखा नेहमी तिच्या इंडस्ट्रीमधला मैत्रिणीविषयी सांगत असते त्यामध्ये ती तितिक्षाचे नाव आवर्जून घेते. पण जिच्यासोबत एकत्र मालिका करत असताना ती बोलतच नव्हते ही गोष्ट ऐकणाऱ्यालाही वेगळी वाटते.

सुलेखा आणि तितिक्षा त्यांनी यापूर्वी सरस्वती आणि तू अशी जवळी रहा या दोन मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. सरस्वती या मालिकेमध्ये सुलेखा आणि तितिक्षा या सासू सून होत्या. तर तू अशी जवळी रहा या मालिकेत त्या मायलेकी म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या. तितिक्षाची पहिली मालिका कन्यादान ही असली तरी तिला खरी ओळख मिळवून दिली ती सरस्वती या मालिकेतील सरस्वती आणि दुर्गा या दुहेरी भूमिकेने. ती हॉटेल मॅनेजमेंट करून हॉटेल सुरू करण्याच्या बेतात होती मात्र तिची मोठी बहीण खुशबू तावडे देखील अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळे तिलाही असं वाटू लागलं की आपण एक ट्राय करून बघायला काय हरकत आहे. सरस्वती मालिका तिच्या हातात आली तेव्हा थोडाफार अभिनय यापलीकडे तसा तिला कॅमेऱ्याचा कोणता अभ्यास नव्हता. यामध्ये ती तिच्या पेक्षा सिनियर असलेल्या सुलेखा तळवलकर चा अभिनय पाहून खूप प्रभावित झाली. सरस्वती या मालिकेत तीन वर्ष सलग त्या दोघी एकत्र काम करत होत्या आणि सासू सूनेच्या भूमिकेत असल्यामुळे अनेक सीन देखील दोघींनी एकत्र दिले.

मात्र आपण तीन वर्षे दोघी का बोलत नव्हतो याचं ठोस कारण दोघींकडेही नसल्यामुळे त्या जेव्हा विचार करतात की आपण एका सेटवर बारा-बारा तास एकत्र असून सुद्धा एकमेकींशी बोलण्याचे निमित्त का मिळाले नाही? आणि याचे उत्तर खरंच त्यांच्या दोघींकडेही नसतं. तितिक्षा सांगते, की खरं सांगायचं तर यामध्ये दोघींचा स्वभाव खूप सारखा आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल तर तिचा तिला वेळ द्यावा असा माझा स्वभाव आहे. आपण बोलायला जाण्यापेक्षा त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याशी बोलावसं वाटेल तेव्हा संवाद होऊ शकतो या मताची मी आहे .आणि हे मत सुलेखालाही पटले कारण सुलेखाचा स्वभावही असाच आहे. सरस्वती मालिका करत असताना तितिक्षा या क्षेत्रात नवीन असल्यामुळे तिही असं वाटलं की आपण ज्युनियर आहोत त्यामुळे आपण सेटवर जास्त बोलायचं नाही किंवा जे काही इतर कलाकार करत आहेत याचे निरीक्षण करायचं, शिकायचं. त्यामुळे जास्त बोलणं चुकीचं ठरेल असा तिचा समज होता.

सुलेखा सांगते, खरे तर गैरसमजातूनच आम्ही दोघी एकमेकींशी बोलत नव्हतो. सरस्वती मालिका संपली, आम्ही थोड्याफार गप्पा मारल्या असतील मात्र मैत्री अशी झाली नव्हती त्यानंतर पुढची सिरीयल, तू अशी जवळी रहा ही आम्हाला दोघींनाही मिळाली. पण जेव्हा मला असं कळलं की या मालिकेत देखील माझ्या सोबत तितिक्षा असणार आहे तेव्हा खरे तर माझ्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. आणि माझ्या मनात असा विचार आला की अरे बापरे पुन्हा मला तिच्यासोबत काम करायला लागेल का… मात्र जेव्हा खरंच ही मालिका सुरू झाली. मालिकेचे चित्रीकरण सुरू झालं तेव्हा आम्हा दोघींना एकत्र जाणून घ्यायला खूप चांगला वेळ मिळाला. तर मेकअप रूम एक एकच होती त्यामुळे बराच वेळ आम्ही एकत्रच मेकअप करायचो. त्यातूनच असे झाले की आमच्या आवडी-निवडी कितीतरी सारखे आहेत हे आम्हाला कळून आलं . त्यानंतर आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झालो. तूअशी जवळी रहा या मालिकेत आमचं नातं आई मुलीचं होतं .

आता आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा सरस्वतीच्या वेळेचा अबोला आणि त्यानंतर तू अशी जवळी रहा या मालिकेच्या निमित्ताने आमच्यामध्ये जुळलेले मैत्रीचे धागे आठवले की आमचं आम्हालाच खूप हसू येतं. सुरेखा तळवलकर गेल्या अनेक वर्षापासून मराठी मालिका सिनेमा नाटक यामध्ये काम करते. स्मिता तळवलकर यांची सून असल्यामुळे तिला या क्षेत्राविषयीची माहिती देखील आहे. तर तितिक्षाची मोठी बहीण खुशबू तावडे ही अभिनेत्री असल्यामुळे तितिक्षाला हे क्षेत्र खुणावत होतं.

सध्या तितिक्षा आणि सुलेखा एकत्र कोणतेच काम करत नसल्या तरी मैत्रीच्या निमित्ताने त्यांची सतत गाठभेट होत असते. आणि प्रत्येक गप्पांच्या मैफलीत हा विषय निघतो की सुरुवातीला आपण बोलत नव्हतो आणि आता तिच्या मैत्रिणी झालो आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER