पवार-फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत बैठकांचे सत्र, प्रफुल पटेलांनी घेतली गुप्त बैठक

Sharad-Pawar-Praful-Patel

मुंबई : नुकताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या मुक्ताईनगर येथील घरी जाऊन चहापान घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. आणि अशातच शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) कामाला लागले आहेत.

त्यांनी मुंबईत गुरूवारी संध्याकाळी काही निवडक विश्वासू मंत्र्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे मुंबईत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना या बैठकीची कल्पनाही नव्हती. पक्षाच्या अशा बैठका होत असतात, मात्र अधिकृतरित्या कोणीही या बैठकीबद्दल भाष्य केले नाही.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या दिवसभरातील बैठका आटोपल्यानंतर संध्याकाळी सह्याद्री गेस्टहाऊसवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला काही निवडक मंत्र्यांनाच बोलावण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार सुनिल तटकरे यांची विशेष उपस्थिती होती.

मुंबईत असूनही पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिका, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे या बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती पुढे आली आहे. पटेल यांनी घेतलेल्या बैठकीची कल्पना अनेक नेत्यांनाही नव्हती. त्यामुळे आगामी काळात पक्षाची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे.

सध्या मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचे आरक्षण, ओबीसींचे आरक्षण आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने सर्वच समाजातील घटक ठाकरे सरकारवर संताप व्यक्त करत आहे. तर ओबीसींचे आरक्षण आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण या विषयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोरासमोर आले आहे. सरकारच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसचे हायकमांड सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागासवर्गीय आणि ओबीसींचे संरक्षण केले पाहिजे, असे पत्र पाठवले होते. मात्र, या पत्राची दखलही मुख्यमंत्री ठाकरे यांनी न घेतल्याने काँग्रेसचे काही मंत्रीही नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या निवडक मंत्र्यांची बैठक सरकारमध्ये, सारे काही आलबेल नाही, हे सांगण्यास पुरेसे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button