निकालानंतर पवार एनडीएमध्ये जाऊ शकतात

Sharad Pawar-NDA

badgeराजकारणात काहीही होऊ शकते याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेतो आहे. आमदार, नेतेच नव्हे तर नातेवाईकही आपापला पक्ष सोडून भाजप-शिवसेनेत जात आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीला अशी महागळती लागली असताना राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणीत एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत बसू शकतात अशी चर्चा आताच सुरु झाली आहे. अस्तित्वाचे संकट केवळ राष्ट्रवादी काँग्रेस झेलत नाहीय. राष्ट्रवादीचा जन्मदाताही संकटात आहे.

ही बातमी पण वाचा : ‘अपना नाना अभीभी मार्केट में चलता है’ – सुप्रिया सुळे

विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसेल तर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेची निवडणूक होईल तेव्हा खुद्द शरद पवार यांना पुन्हा निवडून येणे कठीण आहे. राज्यसभेत निवडून देण्यासाठी विधानसभेत निवडून येणारे आमदार हे मतदार असतात. दोन्ही काँग्रेसची अवस्था सध्या दयनीय आहे. २५-३० आमदार निवडून आले तरी भरपूर झाले. अशा स्थितीत पवारांना पुन्हा राज्यसभा गाठणे अवघड आहे. पण हार मानतील ते पवार कसले? पवार घरी स्वस्थ बसू शकत नाहीत. निकालानंतर पवार राष्ट्रवादीला एनडीएसोबत बसवू शकतात. पवार काहीही करू शकतात. मागच्या विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल यायचे असताना त्यांनी सरकार स्थापण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठींबा जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. या वेळी असा कुठला मास्टरस्ट्रोक पवारसाहेब खेळतात याची राष्ट्रवादीमध्येच चर्चा रंगते आहे. तसे झाले तर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या गयारामांची पंचाईत होणार आहे. पवार आपला खुर्दा करून टाकतील या भीतीने गयारामांचे टेन्शन वाढले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार हेच टार्गेट

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही काँग्रेसला सावरण्याची खूप संधी होती. चांगले पाच महिने होते. पण काही केले नाही. सहकाऱ्यांचे पाय ओढण्याची जुनी सवय अजूनही गेलेली नाही. लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला नगरची जागा शरद पवारांनी सोडली असती तर आजचे राजकीय चित्र काही वेगळे असते. पण त्यापासून धडा घ्यायला कुणी तयार नाही. पुण्यातल्या इंदापूरची जागा काँग्रेससाठी सोडायला शरद पवार तयार नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. पाटलांनी तसा स्पष्ट संकेत दिला असतानाही दोन्ही काँग्रेसचे नेते गप्प आहेत. जाणाऱ्याला थांबवायला कुणीही तयार नाही अशी विचित्र परिस्थिती आहे. काँग्रेस एवढी विकलांग कधीही नव्हती. निवडणूक लढण्यासाठी वैचारिक बैठक नाही, नेते नाहीत, पैसे नाहीत, जनाधार नाही, मीडिया पाठीशी नाही. कसे लढणार? ईव्हीएम तटस्थ राहिल्या तरी निकाल बदलणे अवघड आहे.

ही बातमी पण वाचा : आता एमआयएमने दिला राष्ट्रवादीला धक्का ; ‘या’ नेत्याला जाहीर केली उमेदवारी