मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालकमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambhaji patil-Fadnavis

लातूर : लातूर जिल्ह्यात सध्या ४५ टँकर सुरू असून तब्बल ५५० विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी चाऱ्याची मागणी केल्यास तात्काळ चार उपलब्ध करून देण्याची सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता शिथील करण्यासाठी विनंती केली होती. परंतू आयोगाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तरीही पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूर येथे जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. कोणत्याही परीस्थितीत जनावरांना चारा आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलबध करून द्यावे अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. एप्रिल महिन्यापर्यंत जलयुक्त शिवारची कामे केलेल्या गावांत चांगला पाणीसाठा होता. मे महिना सुरू झाला तरी अद्याप जलयुक्तची कामे केलेल्या गावांत तितकी टंचाई नाही. उर्वरीत गावात मात्र टंचाईची तीव्रता आहे. जिल्ह्यात दहा तालुके असलेल्या लातूर जिल्ह्यात या वर्षी सर्वात कमी पाऊस जळकोट तालुक्यात पडला आहे. त्यामुळे जळकोट आणि लातूर तालुक्यात जास्त टंचाई जाणवत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असली तरी नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून उपाय योजना केल्या जात आहेत, असे निलंगेकर यांनी सांगितले.