शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक

Sharad Pawar - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून डॅमेज कंट्रोल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे.

राज्याचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पूजा चव्हाण ते सचिन वाझे ही प्रकरणे हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अपयश आल्याने देशमुख यांना पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशमुख यांच्याकडील गृहमंत्रिपद काढून ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री बदलण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे.

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केली. यावेळी सचिन वाझेप्रकरणावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले . त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER