लॉजनंतर वडा-पाव, भेळ, मिसळवालेही सुरू करा…

Uddhav Thackeray

Shailendra Paranjapeसरकारने लॉज गेस्ट हाऊस आणि राहण्याची खोल्यांची सोय असलेली हॉटेल्स सुरू होण्यासाठी परवानगी दिली आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या अनलॉकपर्वातलं हे आणखी एक पाऊल. त्याचं स्वागत करतानाच हेही सांगावसं वाटतं की रेस्टॉरण्ट्स, मिसळगृहे, भेळेची दुकानं हीदेखील सुरू करायला हवीत. पार्सल सेवा सुरू झालेल्या हॉटेल्समधून केवळ दहा ते पंधरा टक्के विक्री होत असून सब घोटे बारा टक्के असं या व्यवसायाला मोजून चालणार नाही.

पुण्याबाहेरून एखाद दोन दिवसांसाठी पुण्यात येणाऱ्यांची किंवा नातेवाइकांकडे सुटीतले दोन चार दिवस राहून जाणाऱ्यांचीही प्रतिक्रिया अशी असते की पुण्यातले लोक संध्याकाळी घरी स्वयंपाक करत नाहीत का…. इतक्या प्रमाणात हॉटेल्स, खाण्याचे अड्डे पुण्यात गल्लोगल्ली झालेत. त्याला कारणही तसंच आहे. पुण्यात गेल्या वीस वर्षात शिक्षणासाठी आलेले आणि आज सुमारे आठ ते दहा लाखाच्या घरात संख्या असलेले पुण्याबाहेरचे विद्यार्थी. त्याशिवाय हिंजवडीचा आयटी वा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचा परिसर, त्याशिवाय इतरही भागातले आयटी पार्क्स, वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा, त्यामुळे सुरू झालेली रुग्णालये, या सर्व कारणांमुळं पुण्यात खादाडीची किंवा जाताजाता उभं राहून किंवा ऐसपैस गप्पा मारत बसून खाता येईल, अशी हजारो ठिकाणं गेल्या वीस पंचवीस वर्षात निर्माण झालीत.

हॉटेल्स, खाण्याचे अड्डे, त्यात कच्ची दाबेलीपासून भेळ, रगडा-पुरी, वडापाव, खेकडा भजीचे प्रसिद्ध गाडीवाले, पाणीपुरी स्टॉल्स, दावणगिरी डोसा, लोणी धपाटे मिळण्याचे नवनवे स्टॉल्स हे तर संख्येनं प्रचंड आहेतच पण घरगुती मेस किंवा भाजीपोळी केंद्रही केवळ विद्यार्थी गरजेतून निर्माण झालीत. एकीकडं उद्योगांमधल्या नोकरीची शाश्वती कमी होत गेली तसतसे अनेक घरांमधून पोळीभाजीचा व्यवसाय, मेसच्या सोयी उदयाला आल्या. तशाच अभ्यासिका नावाचा नवा व्यवसायही सुरू झालाय. त्यांनाही हळूहळू परवानगी द्यायला हवी.

तात्पर्य, लॉज, खोल्यांची व्यवस्था सलेली हॉटेल्स, गेस्ट हाउसेस सुरू करतानाच अखिल खाद्यप्रेमींचाही विचार व्हावा, ही मायबाप सरकारला विनंती आहे. काही जणांना ही विनंती समाजविरोधी वाटण्याची शक्यता आहे कारण करोना काळात अशा गाड्यांवर गर्दी वाढेल, सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळले जाणार नाहीत, अशी भीती वाटेल पण अशा शंकासुरांनी पुण्याच्या कोणत्याही भागात कोणत्याही दारूच्या लिकरच्या दुकानाबाहेर जाऊन कोणत्याही वेळी बघावं, दोन चार तळीराम तरी शिस्तीत रांगेत उभे दिसतील. अहो दारु पिणारे शिस्तीत उभे राहतात, तर वडापाव खाणारे का नाही राहणार…

इच्छा तिथं मार्ग असं सांगितलं जातं. तसंच करोना पसरू द्यायचा नाही, ही काळजी आता लोकांनीच घ्यावी, असं जाहीर करायला हरकत नाही कारण हळूहळू सरकारची क्षमता पुरी पडत नाहीये, हेही लक्षात येऊ लागलंय. पुण्यासारख्या पुरोगामी शहरात सुरुवातीला असलेल्या तीन चार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जोडीला आणखी चार अदिकारी देण्यात आले आणि आता आठ आठ आयएएस अधिकारी पुण्याच्या करोनासी झुंझताहेत. त्यामुळं अधिकारी पातळीवरची लढाई सुकर करताना नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल, याचीही तजवीज करायला हवी.

सरकार अनेक उपक्रमात ही जनतेची लढाई व्हावी, जनचळवळ व्हावी, असं म्हणत असतं तसंच करोनाबाबतही आता हे आमचं युद्ध आहे, आम्ही जिंकू, अशी मोकळीक द्यायला हरकत नाही. कारण काळजी काय घ्यावी लागते, हे आता शेबड्या मुलांनाही माहीत आहे आणि जनतेचा वाढता सहभाग खऱ्या अर्थानं अनलॉकपर्व चालू राहिले तरच होऊ शकेल, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आणखी एक पाऊल म्हणून टप्प्याटप्प्यानं खाऊगल्ल्या, अमृततुल्य हॉटेलं, सोशल डिस्टन्सिंग निकष पाळू शकतील, अशी हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्स सुरू करायला हरकत नाही, असं वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER